जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुका का सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेला तालुका आहे. जिथं आता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भरारी फाउंडेशन या सामाजिक संस्थने पुढाकार घेतला असून त्यासाठीच्या ‘शेतकरी संवेदना' अभियानाचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला.


जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भरारी फाऊंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यात ‘शेतकरी संवेदना अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात पारोळा तालुक्यातील ११४ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अभियानाचा औपचारिक उद्घाटन सोहळा पारोळा तालुक्यात आयो्जित करण्यात आला होता.


जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पारोळा प्रांतधिकारी, तहसीलदार, बी.डी.ओ., तालुका कृषी अधिकारी, कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा ग्रामीण यंत्रणा अधिकारी, स्वयंम रोजगार हमी योजना अधिकारी, शिक्षण अधिकारी व आरोग्य अधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहिले. या अभियानासाठी मदत करणारे नामवंत उद्योजक के. के. कॅन्सचे रजनीकांत कोठारी, कृषी सम्राटचे बाळासाहेब सुर्यवंशी, स्पार्क इरिगेशनचे रवी लढ्ढा, सुरेश कलेक्शनचे मुकेश हसवानी, नवरंग चहाचे अमर कुकरेजा नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील यांच्या सहकार्याने हे अभियान राबवण्यात येत आहे.


‘शेतकरी संवेदना अभियान’ कशासाठी?


मागील काही वर्षात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. शेतकऱ्यांच्या निधनानंतर त्याच्या परिवारावर मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाने काय करावे? हा प्रश्न असतो. म्हणून भरारी फाउंडेशनने ‘शेतकरी संवेदना अभियान’ हे अभियान सुरू केलं आहे. यासाठी प्रत्येक गावात शेतकरी मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शेतीसोबत जोडधंदा उभारण्यासाठी आर्थिक मदत कशा पद्धतीने उपलब्ध होते, जोड व्यवसाय उभारण्यासाठी यंत्र आणि साधनं कशी मिळू शकतील, महिलांना बचत गटांना स्वयंपूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या शासनाच्या योजना, बी-बियाणे, खते, विहीर, बोरवेल, पाईपलाईन टाकण्यासाठी सहकार्य, मुला-मुलींचे लग्नकार्य , शिक्षणा सह संवादाच्या माध्यमातून व्यसना धीनता टाळणे, मानसिक आरोग्य जपणे, शेती पूरक उद्योग उभारणी करणे या विषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे.


Video | समुहनृत्यात सहभागी होत ममता बॅनर्जीही थिरकतात तेव्हा....


मेळाव्यासाठी तालुक्यातील 114 गावातील आत्महत्याग्रस्त परिवारातील शेतकरी कुटुंबियांसह अनेक प्रगतीशील शेतकरी या संवेदना मेळाव्याला उपस्थित होते. शेतकरी आत्महत्या टाळणे हे भरारी फाउंडेशनचं उद्दिष्ट असून त्यासाठी शेतकरी संवाद वाढवण्याचा आणि त्या माध्यमातून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे.


मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पहिल्यांदा मानसोपचार तज्ञ कडून उपस्थित शेतकरी आणि त्यांच्या परिवाराला मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित शेतकरी परिवाराला मनोविकार ग्रस्त व्यक्तीची लक्षणं सांगितली. यामध्ये एकटे राहणे, चिडचिड करणे, निराशा दाखवणे, जगण्याची ईच्छा नसल्याचे बोलून दाखवणे, कामात लक्ष नसणे, निद्रानाश अशा प्रकारची प्राथमिक लक्षणे ही मनोविकाराची असतात असं सांगितलं. अशा व्यक्ती जास्त करून आत्महत्येकडे प्रवृत्त होत असल्याने अशी लक्षणे दिसल्यावर कुटुंबीयांनी या व्यक्ती कडे जास्त लक्ष दिले पाहिजे आणि अशा व्यक्तींना मानसिक आधार देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला पाहीजे, त्यांच्या उपयोगीते बाबत त्यांना सांगून त्यांचा जगण्याचा विचाराला बळ दिले पाहिजे,ज्या गोष्टीने अशा व्यक्ती चे मानसिक संतुलन बिघडत असेल ते टाळले पाहिजे,मनोविकाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार केल्यास मनोविकार हा आजार बरा होऊ शकतो आणि आत्महत्ये सारखी घटना आपण टाळू शकतो अस मानसोपचार तज्ज्ञांनी म्हटलं आहे