कोलकाता : काही राजकीय नेते हे त्यांच्या कारकिर्दीसोबतच समाजात असणाऱ्या त्यांच्या अनोख्या अंदाजामुळंही प्रकाशझोतात असतात. अशाच नेतेमंडळींपैकी आणि देशाच्या राजकीय पटलावरील सक्रिय असणारं एक नाव म्हणजे ममता बॅनर्जी.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच एका सामुहिक विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली होती. अलीपूरदुआर जिल्ह्यातील Falakata येथे हा कार्यक्रम पार पडला. याचदरम्यानचा एक व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेकडून शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये बॅनर्जी चक्क सामुहिक नृत्यात सहभागी होत कलाकारांसोबत त्यासुद्धा थिरकताना दिसत आहेत.


बाबो! क्रेननं हार घालत धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत


तृणमूल काँग्रेस प्रमुखपदी असणाऱ्या बॅनर्जी या व्हिडीओत एका गटातून दुसऱ्या गटात जाऊनही नृत्याचा आनंद घेताना दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद त्यांनी घेतला शिवाय नवविवाहित दाम्पत्यांना त्यांनी यावेळी भेटवस्तूही दिल्या.
ममता बॅनर्जींनी स्थानिक कलाकारांसमवेत अशा कोणा कार्यक्रमात सहभागी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये याच अंदाजात पाहिलं गेलं होतं. कोलकात्यामध्ये एका शासकीय कार्यक्रमातही त्या काही आदिवासी कलाकारांसोबत थिरकल्या होत्या.





एकिकडे एका अनोख्या अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या याच ममता बॅनर्जी दुसरीकडे भाजपवर वेळोवेळी निशाणा साधताना दिसतात. भाजपकडून कितीही आश्वासनं देण्यात आली तरीही, आश्वासनं न पाळण्यात हा पक्ष सर्वात पुढे आहे, असा टोलाही त्यांनी नुकताच लगावला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला शेतकरी विरोधी आणि देशविरोधी अर्थसंकल्प असल्याचं म्हणतही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.