Sharad Ponkshe : '19 जून 1966 या वर्षामध्ये काय काय घडलं, या हिंदुस्थानातले पहिले हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर यांचं 26 फेब्रुवारी 1966 रोजी निधन झालं, त्यानंतर चार महिन्यांनी दुसऱ्या हिंदुहृदयसम्राटाचा जन्म झाला, तो आजचा दिवस', असं म्हणत शरद पोंक्षें यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यात आक्रमक भाषण केलं. तसेच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत देशाची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं. पण या भाषणावेळी त्यांना वेळ संपली अशी चिठ्ठी आली, त्यावर शरद पोंक्षेंनी काहीशी नाराजी देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. पण त्यांनी व्यासपीठावर उपस्थितांची परवानगी घेऊन त्यांचं भाषण सुरु ठेवलं.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्ष फुटला आणि त्याचे दोन गट झाले. त्यानंतर दसरा मेळावा असो किंवा वर्धापन दिन हे दोन व्हायला लागले. त्यामुळे मागच्या दोन वर्षात पक्ष जरी एक असला तरीही दोन आव्वाज महाराष्ट्रात घुमू लागले. 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली. आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. ठाकरे गटाचा मेळावा हा षण्मुखानंद येथे तर शिंदे गटाचा मेळावा वरळी डोम येथे पार पडत आहे. अनेक दिग्गजांची भाषणं दोन्ही व्यासपीठांवर होत आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील शिंदे गटाच्या मेळाव्यात आक्रमक भाषण केलं.
'पहिले हिंदुहृदयसम्राट वीर सावकर, दुसरे बाळासाहेब'
शरद पोंक्षे यांनी म्हटलं की, 'बरोबर 58 वर्ष झाली आहेत. 58 वर्षांपूर्वी शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना झाली, ती स्थापना का झाली, हे आठवण्याची आज खूप गरज आहे. त्यानंतर त्या संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर झालं आणि संघटनेची मूळ उद्दिष्ट विसरुन गेलो. आजचा हा दिवस शिवसेना ह्या राजकीय पक्षाचा नाही, आजचा हा दिवस शिवसेना नावाच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेचा वर्धापन दिन आहे. पण जोपर्यंत आपण सत्तेत येत नाही, तोपर्यंत बदल घडवता येणार नाही. म्हणून ठाण्यातून पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी निवडूक लढवली आणि शिवसेनेचे राजकीय पक्षात रुपांतर झालं. काहीतरी ईश्वाराचे संकेत असतात, 19 जून 1966 या वर्षामध्ये काय काय घडलं, या हिंदुस्थानातला पहिला हिंदुहृदयसम्राट वीर सावरकर यांचं 26 फेब्रुवारी 1966 रोजी निधन झालं, त्यानंतर चार महिन्यांनी दुसऱ्या हिंदुहृदयसम्राटाचा जन्म झाला, तो आजचा दिवस.'
'एकालाही हिंदुत्व काय हेच माहिती नाही'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'पण आपण आज सगळं विसरुन गेलोय. या सेक्युलरिझमच्या नावाखाली आपण धर्मच विसरलो आहोत. गेल्या दोन वर्षात तर फार गंमती जंमती पाहायला मिळाल्या. आमचं हिंदुत्व, तुमचं हिंदुत्व,आमचं ह्याचं हिंदुत्व नाही, मुळात एकालाही हिंदुत्व काय हेच माहिती नाही. आज भारत देशासमोरची परिस्थिती फार भयंकर आहे. एक आख्खा देश इस्लामच्या धर्माखाली आपण देऊन टाकला, भारतमातेच्या शरीराचा एक टुकडा 47 ला एका इस्लामिक धर्माला दान करुन टाकला. पण उरलेलं राष्ट्र मात्र हिंदू राष्ट्र होऊ शकलं नाही. त्यामध्ये सेक्युलरिझम घुसवला गेला, मुळात त्याचा अर्थच राजकीय पक्षांना माहिती नाही, फार कमी राजकीय पक्ष असतील ज्यांना हे माहिती असेल. कारण सेक्युलरिझम आणि हिंदूत्व वेगळं काढताच येणार नाही. पण मुळात आम्हाला धर्म माहित नाही, धर्म कशाला म्हणतात, हे आधी कळलं, तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे धर्म कळतील. पण धर्म काय हे तर कळायला हवं.'
चालू भाषणामध्येच चिठ्ठी
दरम्यान शरद पोंक्षे यांचं भाषण सुरु असताना त्यांना भाषणाची वेळ संपली अशी चिठ्ठी आली, त्यावर त्यांनी म्हटलं की, किती वेळात संपवायचं, वेळ संपली, म्हणून मला इथे असं बोलायला आवडत नाही. माझ्या नंतर जे बोलणारे आहेत, थोडासा वेळ आहे, एवढं तर पूर्ण करतो. कारण काय आहे ना, हा विषय शुभेच्छा देण्यापुरता नाही, थोडा वेळ असेल तर पूर्ण करतो. जास्त नाही बोलणार, फार वेळ नाही घेणार.
'निवडणुकांनी भीषण असं वास्वत दाखवलं'
पुढे त्यांनी म्हटलं की, हिंदू या अक्षरांमध्येच सेक्युलरिझम दडलेलं आहे. त्यामुळे मी हिंदुत्ववादी आहे म्हणजेच मी सेक्युलर आहे, हे मला वेगळं पटवून द्यायची गरज नाही. आपल्याला धर्म या शब्दाचा अर्थच माहित नाही, इंग्रजी भाषेचं असं भूत आहे, डोक्यावर आमच्या. माझं इंग्रजी कच्च आहे आणि याचा मला अभिमान आहे. रिलीजन म्हणजे धर्म नाही बरं का.. हा देश निधर्मी आहे, देश निधर्मी कसा असू शकतो. या जगामध्ये निधर्मी काहीच नाही. म्हणून आज मी तुम्हाला धर्म म्हणजे हे समजवून सांगणार आहे मग कळेल धर्म म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. 24 च्या निवडणुकांनी आम्हाला अतिशय भीषण असं वास्वत दाखवलं आहे. जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो.