सोलापूर : माढा लोकसभेला मिळविलेल्या जोरदार विजयानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने माढा लोकसभेतील सर्व सहा विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. माढा विधानसभेसाठी (Madha Vidhan Sabha Election) मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite) यांच्यासोबत एकहाती किल्ला लढवणारे ओबीसी नेते शिवाजी कांबळे (Shivaji Kamble) यांच्या नावाचा विचार विधासभेसाठी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यांच्या उमेदवारीने शरद पवार ओबीसी मतांची बेरीज करण्याची शक्यता आहे. 


माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने लोकसभेला तब्बल 52 हजाराचे मताधिक्य मिळवले. ओबीसी समाजाची भरभरून मते मिळवून देणारे शिवाजी कांबळे हे सध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत. पहिल्या दिवसापासून माढा विधानसभा मतदारसंघातून 50 हजारापेक्षा जास्त आघाडी मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त करणारे शिवाजी कांबळे हे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान ठरू शकतात. त्याची जाणीव शरद पवार यांना असल्यानेच शिवाजी कांबले याचं नाव सध्या आघाडीवर आहे. 
     
गेली सहा टर्म माढा विधानसभेचा किल्ला राखणारे पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि सध्या अजितदादा गटात असणारे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे हे यावेळी निवडणूक लढविणार नसल्याच्या चर्चा आहेत. गेले काही दिवस तब्येतीचा त्रास सुरु झाल्याने यावेळी ते त्यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे याना उभे करू शकतात. 


आमदार बबनदादा शिंदे यांची आजही मतदारसंघावर चांगली पकड असून सर्व सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. गावोगावी असणारी कार्यकर्त्यांची फळी आणि बारा महिने जनतेत असणारा संपर्क यामुळे आजवर शिंदे यांना हरवण्यात विरोधकांना अपयश आलं आहे. मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप विरोधी लाटेत मोहिते पाटील यांनी शिंदे यांच्यावर मात केली. त्यामुळेच शिंदे विरोधकांचा आत्मविश्वास वाढल्याने यंदा माढा लोकसभेनंतर माढा विधानसभा देखील जिंकायची तयारी पवार गटाने केली.


माढ्याचे जातीय गणित काय?


माढा लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाच्या बरोबरीने धनगर, माळी, मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांची संख्या असल्याने या ओबीसी मातांना पुन्हा एकदा विधानसभेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरु झाले आहेत. माढा विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून शिवाजी कांबळे आणि संजय कोकाटे हे दोन मातब्बर उमेदवार सध्या इच्छुक असून धनगर समाजाचे शिवाजी कांबळे यांचे पारडे जड आहे. 


कोण आहेत शिवाजी कांबळे? 


शिवाजी कांबळे हे शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्याला परिचित असून एक प्रभावी वक्ता आणि प्रशासनावर मजबूत पकड असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. शिवाजी कांबळे यांनी 1995 साली अरण ग्रामपंचायतमधून बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 


यानंतर 1997 साली  मोडनिंब जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले. यानंतर 2002 साली  कुर्डू जिल्हा परिषद गटातून तर 2007 साली मोडनिंब जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. यानंतर 2012 मध्ये ते बेंबळे जिल्हा परिषद गटातून परत जिल्हा परिषदेवर निवडून गेले. 


प्रत्येक वेळी वेगळ्या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभे राहत त्यांनी हे विजय मिळवल्याने माढा तालुक्यात प्रत्येक गावात संपर्क असणारा नेता म्हणून त्यांची ओळख झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेवर सलग दोन वेळा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून काम करताना त्यांनी मागास आणि इतर मागास समाजात चांगली घडी बसवल्याचं दिसतंय.यामुळेच धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देताना शरद पवार यांनी शिवाजी कांबळे यांना त्यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि माढा विधानसभेची जबाबदारी त्यांचेवर सोपवली होती. 


कसा आहे माढा विधानसभा मतदारसंघ? 


माढा विधानसभा हा माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्याचा मिळून बनला आहे . 


1) माढा विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील 14 गावे असून एकूण मतदान जवळपास 75 हजार इतके आहे.  


2) माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावे असून एकूण मतदान हे 1 लाख 15 हजारांपेक्षा जास्त आहे.  


3) माढा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील 78 गावे असून एकूण मतदार 1 लाख 60 हजारापेक्षा जास्त आहे . 


माढा विधासभेतील एकुण गावे


माळशिरस 14  गावे   + पंढरपूर 42 गावे + माढा 78  = 134 गावे 
  
विधानसभेतील एकूण मतदान तीन लाखापेक्षा जास्त 


माढा विधानसभेमध्ये जातीय समीकरणे मराठा 35 टक्के.
इतर ओबीसी , मुस्लिम व मागास  वर्गीय  65 टक्के.


माढा विधानसभेतून लोकसभेला एकूण पोलिंग झालेले मतदान दोन लाख 24 हजार 


माढा लोकसभेत माढा विधानसभेतून प्रमुख उमेदवाराला मिळालेली मते,


1) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा विधानसभेत मिळालेली मते 1,22,570


2) भाजपचे उमेदवार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना माढा विधानसभेत मिळालेली मते 70,055


3) न्यू रासप पक्षाच्या उमेदवार रामचंद्र घुटुगडे (पिपाणी चिन्हं) यांना माढा विधानसभेत मिळालेली मते 13,293


या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा विधानसभेतून 52 हजार 515 मताचे मताधिक्य मिळाले.


ही बातमी वाचा :