मुंबई: राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ चिन्ह  (Nationalist Congress Party) कुणाचं  या मुद्द्यावरून आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गट निवडणूक आयोगामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहेत. सर्वाधिक आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा हा आपल्यालाच असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे आणि त्याच मुद्द्यावरून शरद पवारांच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेतला. अजित पवार गटाकडून शरद पवारांची या आधीच अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगामध्येही तसे मुद्दे मांडत राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा अजित पवारांनी केला. पण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांची हकालपट्टी करण्याची घोषणा करणारे अजित पवार हे पहिले नेते नाहीत. त्या आधीही 2004 साली पीए संगमा (P. A. Sangma) यांनी शरद पवारांची हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती आणि स्वतःला अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं होतं. 


सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावर आक्षेप घेत शरद पवार, तारिक अन्वर आणि पीए संगमा या काँग्रेसच्या तीन नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बनले. नंतर शरद पवारांनीच काँग्रेससोबत युती केली आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हीच गोष्ट राष्ट्रीय स्तरावरही करत 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. 


पीए संगमा यांनी शरद पवार यांच्या या भूमिकेला विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस सोबत जाऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. 


शरद पवारांची हकालपट्टी केल्याची घोषणा (PA Sangma Vs Sharad Pawar Case) 


पीए संगमा यांच्या विरोधानंतरही शरद पवारांनी आपली भूमिका कायम ठेवत काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. पीए संगमा यांनी 2004 साली शरद पवारांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली आणि स्वतःला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी घोषित केलं. त्याचसोबत पीए संगमा यांनी निवडणूक आयोगात धाव घेत राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला. 


राष्ट्रवादी आपलीच असल्याचा संगमा यांचा दावा 


राष्ट्रवादी  काँग्रेस आपलाच असल्याचा दावा करत संगमा यांनी घड्याळ चिन्ह आपल्यालाच मिळावं अशी मागणी निवडणूक आयोगासमोर केली. घड्याळ चिन्ह जर आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवण्यात यावं असाही पर्याय ठेवला. आपण राष्ट्रवादीच्या संस्थापकापैकी एक असल्याचं सांगत पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा आपल्यालाच असल्याचा दावा संगमा यांनी केला. 


सर्वाधिक संख्या आपल्याकडे असल्याचा पवारांचा दावा 


शरद पवार विरूद्ध पीए संगमा ही राष्ट्रवादीतील लढाई निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर यावर सुनावणी सुरू झाली. शरद पवारांनी आपल्याकडे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याचा दावा केला. त्यावेळी पक्षातील सर्वाधिक आमदार आपल्यामागे असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांकडे त्यावेळी विधानसभा आणि विधानपरिषदेचे 78 आमदार होते तर संसदेतील 9 खासदारांचा पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा केला होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय संघटनेतील 657 पैकी 438 पदाधिकारी आपल्या मागे असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा पवारांनी निवडणूक आयोगासमोर केला होता. 


समर्थकांची प्रतिज्ञापत्रकं दाखल 


पी ए संगमा यांनी त्या आधी त्यांच्या समर्थकांची बैठक घेतली होती. पण ती पक्षाची बैठक नसून खासगी बैठक असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. संगमा यांना ईशान्येकडील राज्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. शरद पवारांना महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील पदाधिकांऱ्यानी पाठिंबा दिला. दोघांनीही आपापल्या समर्थकांची प्रतिज्ञापत्रकं दाखल केली होती.


शरद पवारांच्या बाजूने निर्णय


शरद पवारांनी केलेल्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार गटाचं असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर पीए संगमा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 


अजित पवार गटाकडून पीए संगमा केसचा दाखला


आता जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये अजित पवार गटाने त्या वेळच्य पीए संगमा केसचा दाखला देत राष्ट्रवादीवर दावा केला आहे. सर्वाधिक आमदार आणि पदाधिकारी, त्यांची प्रतिज्ञापत्रकं आपल्याकडेच असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. त्याच आधारे राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.


तब्बत 20 वर्षांपूर्वी शरद पवार गटाने ज्या गोष्टीचा आधार घेत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता तोच दावा आता त्यांचे पुतणे अजित पवार करत आहेत. त्यामुळे दोन्ही गटाच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादी पक्ष कुणाचा याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. 


ही बातमी वाचा :