मुंबई : भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्यसरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून या विषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली असून गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये शरद पवार जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.


या गंभीर विषयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी शरद पवार यांची चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.


भाजप केंद्र सरकारचा दुरुपयोग करून निवडून आलेल्या सरकारांचे अधिकार काढून घेण्याचा व त्यांना पाडण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. या विषयावर शरद पवार ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांशी चर्चा झाली आहे. नक्कीच रणनीती ठरवून पुढे काम केले जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.