सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या अनेक गाथा आजवर आपण ऐकल्या आहेत. अशाच एका गाथेला आणि अर्थातच महाराजांच्या पराक्रमाला आजच्या म्हणजेच 21 डिसेंबर 2020 या दिवशी तब्बल 352 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही घटना आहे प्रतापगडावरील अफजलखान वधाची. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या घटनेची आठवण करुन देणारा हा दिवस.


अशा या दिवसाची आठवण म्हणून प्रतापगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रतापगडावर देवीची पुजा, ध्वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक, पुष्पहार अर्पण असेच कार्यक्रम पार पडत आहेत. दरवर्षीप्रमाणं गडावरील देवीच्या मंदिरात पूजा करण्यात आली. याशिवाय महाराजांच्या पालखीच्या मिरवणुकीचंही आयोजन गडावर करण्यात आलं. यानंतर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.



दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गडावरील या सोहळ्यावर अनेक निर्बंध आहेत. गडावर संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मनोरंजन, देखाव्यांनांही प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. त्यामुळं शिवप्रताप दिन अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा होत आहे. संचारबंदी लागू असल्यामुळं परिणामी शिवप्रेमींना गडावर येण्यास मज्जाव आहे. ज्यामुळं शिवप्रेमींमध्ये काहीसं नाराजीचं वातावरणही पाहायला मिळत आहे.


कोरोनाचं सावट इथंही


गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोना व्हायरसचं सावट सर्वत्र पाहायला मिळत आहे. सण- उत्सवांपासून ते थेट दैनंदिन जीवनातील व्यवहारही यामुळं कोलमडले आहेत. त्याचाच प्रत्यय प्रतापगडावरील शिवप्रताप दिन उत्सवातही पाहायला मिळत आहे. अतिशय थाटामाटात आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात यंदा मात्र कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे.