मुंबई: महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा आणि त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा आहे, तो वाढविला पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. दांभिक धार्मिक व्यवस्थेला आव्हान देऊन लोकांची मानसिक गुलामीतून मुक्त करण्याची महात्मा फुलेंची भूमिका असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांना मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "सत्यशोधक समाजाची स्थापना झाली त्यामागील पार्श्वभूमी लक्षात घेण्यासारखी आहे. महात्मा फुलेंचे वैशिष्ट्य हेच आहे की त्यांनी सत्याचा ध्यास घेतला होता. धार्मिक आणि विशेषतः दांभिक धार्मिक व्यवस्थेला आव्हान देऊन मानवाची मानसिक गुलामगिरीमधून मुक्तता करण्याची त्यांची भूमिका होती."
शरद पवार पुढे म्हणाले की, पेशवाईच्या उत्तर काळात जातिभेद आणि अनाचार याची परिसीमा गाठली होती. हिंदू धर्माची ही अवनीती पाहून दोन लोकांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली. एक पश्चिम बंगालमधील राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रात आत्माराम तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. याच दृष्टीने, याच विचाराने आणि याच धर्तीवर सत्यशोधक समाजाची स्थापना ही ज्योतिबा फुले यांनी केली. त्यामागे धार्मिक व सामाजिक सुधारणा असा दुहेरी दृष्टीकोन होता.
महात्मा फुले सत्यशोधक चळवळीची प्रेरणास्थाने सांगताना शिवछत्रपतींचा प्राधान्याने उल्लेख करीत असं सांगत शरद पवार म्हणाले की, "अठरापगड जातीचे राज्य महात्मा फुलेंना देखील अभिप्रेत होते. ज्योतिबा फुले यांचा विचार म्हणजे परिवर्तनाचा विचार, विज्ञानाचे समर्थन करणारा विचार, शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करणे आणि त्याच्या दुःखाची मांडणी करणे हे सूत्र घेणारा हा विचार आहे."
शरद पवार म्हणाले की, "ज्योतिबा फुले यांचा विचार म्हणजे परिवर्तनाचा विचार, विज्ञानाचे समर्थन करणारा विचार, शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करणे आणि त्याच्या दुःखाची मांडणी करणे हे सूत्र घेणारा हा विचार आहे. तो विचार जतन केला पाहिजे एवढीच आजची गरज आहे. सत्यशोधक समाजाची विचारधारा नव्या पिढीतील शेवटच्या तरुणापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे."