Who Is Champa Singh Thapa: शिवसेना नेमकी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगासमोर आणि सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तर, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिंदे गटात डाव-प्रतिडाव टाकला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका भावनिक डाव टाकला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहाय्यक आणि मातोश्रीचा सेवक अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण, हे चंपासिंह थापा आहेत तरी कोण?
चंपासिंह थापा यांची शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहाय्यक अशी ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापा हे बाळासाहेबांची सावली झाले असे म्हटले जाते. नेपाळहून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्ताकारणात एक महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा मदतनीस होण्याचा प्रवासही वेगळा आहे.
बाळासाहेबांचा सेवक
चंपासिंह थापा हे जवळपास चार-पाच दशकांपूर्वी नेपाळमधून भारतात पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते. गोरेगावमध्ये लहान-सहान कामे करत असताना भांडूपमधील नगरसेवक के.टी. थापा यांच्यासह चंपासिह थापा मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर बाळासाहेबाना शांत चेहरा आणि भेदक नजर असलेला तरूण मातोश्रीवर थांबवून घेतला. 1980-85 पासून थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचा खास विश्वासू मदतनीस झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा दिनक्रम सांभाळणे, त्यांची सेवा करणे याला थापा यांनी वाहून घेतले.
मीनाताई ठाकरे यांच्या अकाली निधनानंतर थापा यांनी बाळासाहेबांच्या औषधांच्या वेळा सांभाळणे, त्यांची सेवा करणे याला थापा यांनी वाहून घेतले होते. चंपासिह थापा हे मातोश्रीतील एक सदस्य झाले होते. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीशेजारी त्यांची एक लहान खोली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा, जाहीर सभांमध्ये चंपासिंह थापा हे त्यांच्या सावलीसारखे दिसून यायचे.
महाराष्ट्रात रोजगारासाठी येणारा नेपाळी तरुण, नागरीक थापा यांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. नेपाळमध्ये शिवसेना सुरू करण्यात त्यांचाही वाटा आहे. अशी एखाद कृती वगळता छापा राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. मात्र, शिंदे गटाने त्यांना आपल्या बाजूने वळवून शिवसेनेविरोधात भावनिक डाव टाकला आहे.
शिंदेंचा भावनिक डाव यशस्वी होणार?
शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांविरोधात कुरघोडी करत आहे. ऐन दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी भावनिक डाव टाकला आहे. बाळासाहेबांची सावली असणारे चंपासिंह थापा यांना आपल्याकडे खेचून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिवसैनिकांमध्ये जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पदाधिकारीचे नव्हे तर बाळासाहेब यांचे सहकारीदेखील उद्धव यांना सोडून जात असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवण्याच्या प्रयत्न शिंदे गटाकडून आगामी काळात होणार असल्याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे.