रायगड : देशात आणि राज्यात मोदींना (Narendra Modi) विरोध वाढत आहे, लोकांना मोदी नको आहेत, बदल हवा आहे, त्यामुळेच आता भाजपकडून हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण केला जातोय अशी टीका शरद पवार (Sharad Pawar)  यांनी केली. सोमवारी मोदींनी केलेलं भाषणं लाज वाटण्यासारखं होतं, ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते एका समाजाबाबत इतकं वाईट बोलतात, त्यामुळं देशात विद्वेष वाढेल अशी परिस्थिती आहे असंही शरद पवार म्हणाले. रायगडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अंनत गिते यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. 


शिवाजी महाराज हे वेगळे राजे होते, कारण साडेतीनशे वर्षे झाली तरीही अजूनही लोकांच्या मनात ते घर करून आहेत. त्यांनी जे राज्य केलं ते एका जाती जमातीच राज्य नव्हतं, त्यांनी कधीही भोसले यांचे राज्य आहे असं म्हटलं नाही. त्याचं राज्य समाजातील सर्व घटकांचे राज्य होतं अस शरद पवार म्हणाले. 


शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे, 


मोदींच्या काळात महागाई वाढली


महागाईचा सर्वात मोठा प्रश्न लोकांसमोर आहे. नरेंद्र मोदी म्हणाले होते की सहा महिन्यात महागाई दूर करतो. परंतु आज परिस्थिती जैसे थे आहे. गॅसची किंमत वाढली आहे. मोदी यांच्या 10 वर्षांच्या काळात अजूनही महागाई तशीच आहे. जगात मोठी एक संस्था आहे त्याने बेकारीचा अभ्यास केला त्यात 86 टक्के तरूण बेरोजगार आहेत. मग मोदींची काय गॅरंटी आहे?


देशात लोकशाही टिकवण गरजेचं आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही होती त्या ठिकाणी लष्कराने देश हातात घेतला आणि त्यामुळं तिथं हुकूमशाही आली. बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये तेच झालं. तिथं देखील हुकूमशही आली.


रशियामध्ये पुतीनमुळे लोकशाही नाहीशी झाली. आता आपल्या देशात मोदी पुतीन होत आहेत. त्यामुळं लोकशाही जाऊन हुकूमशाही येईल.


विरोधात बोलले म्हणून दोन मुख्यमंत्री जेलमध्ये


झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांनी मोदीच्या विरोधात टीका केली. आज त्या राज्याचा मुख्यमंत्री जेलमध्ये आहे. मला या ठिकाणी आपचे लोक दिसत आहेत. दिल्लीत आपने केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात भूमिका घेतली. आज त्या राज्याचे मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत. अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात मत व्यक्त केली. त्याचा परिणाम त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये यावर लक्ष ठेवलं जात आहे. या सगळ्या गोष्टी दिल्लीत घराघरात जात आहेत. 


काही झालं तर हे हिंदू मुस्लिम करतात


बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली आहे. ती घटना संकटात आली आहे. मोदी यांच्या जवळचे म्हणतात की आम्हाला घटना बदलायची आहे. घटनेत बदल करण्यासाठी भाजपला 400 पार जायचे आहे. काही झालं हिंदू मुस्लिम करण्याच काम सुरू आहे. 


मला लोकसभेत जाऊन 56 वर्ष झाली. आजपर्यंत माझं काम सुरू आहे. लोकांचे काम पाहण्याची संधी मिळाली. मी विरोधी पक्षाचा नेता होतो त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी बैठक बोलवायचे. त्यावेळी आम्हाला बोलवलं जायचं. त्यावेळी वाजपेयी आमची मत देखील विचारत घ्यायचे. हे पंतप्रधान तसे नाहीत. 


पहिल्या टप्प्यात नागपूरमध्ये कमी मतदान झालं. मात्र गडचिरोलीमध्ये जास्त मतदान झालं. जिथं आदिवासी भाग आहे तिथं चांगलं मतदान झालं. मात्र जिथं उपराजधानी आहे तिथ कमी मतदान झालं हे योग्य नाही. जास्तीत जास्त मतदान व्हायला हवं. 80 टक्क्यापर्यंत मतदान व्हायला हवं.


अजित पवार टोला


काही लोक म्हणतात की आमच्याकडे मोदी आहेत तुमच्याकडे कोण आहे. आम्ही त्याचा विचार करत नाही. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यावेळी निवडणुकीपूर्वी चेहरा ठरला नव्हता. ते म्हणाले की तुमच्याकडे चेहरा कोण आहे, तर त्यांना सांगा आमच्याकडे कोट्यवधी जनता हाच चेहरा आहे.


ही बातमी वाचा: