Sharad Pawar Resigns: शरद पवार (Sharad Pawar) यांनीच राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदावर राहावं, अशी मागणी मागील दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भामध्ये नेमलेल्या समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अध्यक्ष निवडायचा की, कार्याध्यक्ष करायचा या संदर्भातला निर्णय होणार असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 


आज शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर समिती निर्णय देणार आहे. समिती काय निर्णय देणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच एबीपी माझाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा (National Congress Party ) ॲक्शन प्लॅन तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार आहे. प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील.  पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समस्य समिती देणार आहे. पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे. 


शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीया सुळेंच्या व्यतिरिक्त इतर कोणाचंही नाव चर्चेत नाही, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आज समिती काय निर्णय देणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 


अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?


प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.


काय म्हणाले शरद पवार? 


कार्यकर्ते आणि प्रमुख  नेत्यांच्या नाराजीनंतर, त्यांच्या आंदोलनानंतर शरद पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे. पक्षातल्या लोकांच्या तीव्र भावना मला दिसत असून मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला असल्याचं पवार म्हणाले. नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मला एक खात्री होती की मी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही सकारात्मकता दर्शविली असती, तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती. पण मी ते केलं नाही अशी प्रांजळ कबुली शरद पवारांनी आपल्या प्रेमापोटी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संवादा दरम्यान दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sharad Pawar Resigns: आज, उद्या, परवा... साहेब, साहेब आणि फक्त साहेबच; पोस्टर्स झळकावून कार्यकर्त्यांकडून शरद पवारांची मनधरणी