Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज पुण्यातील नदीसुधार प्रकल्पाचे  उद्घाटन झाले आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील नद्यांचं रुपडं बदलून जाईल असा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र, या प्रकल्पामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण होईल, अशी भीती राष्ट्रवादीकडून व्यक्त होत आहे.

  
 
पुण्याच्या मध्यवर्ती भागातून मुठा आणि मुळा या दोन नद्या वाहत आहेत. या नद्यांचं साध्याचं प्रदूषित आणि ओंगळवाणे रूप पालटून त्या स्वच्छ व्हाव्यात यासाठी नदी सुधार प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी गुजरात मधील साबरमतीच्या धर्तीवर पुण्यातील मुठा आणि मुळा या नद्याही चकचकीत होतील असं म्हटलं आहे.   


नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याच्या आधीच शरद पवार यांनी या नदीसुधारणा प्रकल्पाला जोरदार आक्षेप घेतला आहे. हा प्रकल्प अंमलात आल्यास पुण्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 


नदी सुधार हा प्रकल्प पाच हजार कोटींचा असून 11 टप्प्यांमध्ये तो राबवण्यात येणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून त्याची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नद्यांच्या काठांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून गुजरातमधील साबरमतीच्या धरतीवर नदी पात्रात कायमस्वरूपी पाणी राहील याची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सध्या सुरु असलेले नदी पात्रातील रस्ते बंद करण्यात येणार असून नदीच्या दोन्ही बाजुंच्या खासगी जमिनी देखील अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. 


पाच हजार कोटींची ही योजना महापालिका राबवणार असून त्यासाठी केंद्र सरकार निधी पुरवणार आहे. मात्र, त्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. हाच धागा पकडत शरद पवार यांनी आपण जयंत पाटील यांच्याकडे असलेल्या जलसंपदा विभागाकडूनही याबाबत माहिती घेऊ असं म्हटलंय. या प्रकल्पावरून राजकीय कलगीतुरा रंगलेला असताना पर्यावरण अभ्यासकांनी देखील या प्रकल्पामुळे पुण्यात सातत्याने पूरस्थिती निर्माण होईल असं म्हटलंय. 


दरम्यान, या प्रकल्पाबरोबरच पुण्यात जायकाच्या माध्यमातून मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जपानच्या जायका कंपनीने एक हजार कोटींचे अनुदान 2015 मध्ये देऊ केलं होतं. परंतु, मागील सात वर्षांमध्ये हा प्रकल्प सुरूच न झाल्याने त्याची किंमत वाढून चौदाशे कोटींवर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकल्पाचंही आज उद्घाटन केलं आहे. परंतु, यावरून सुरु झालेलं राजकारण पाहता हे प्रकल्प खरच पूर्ण होतील का? आणि झाले तर, कधी होतील? असा प्रश्न पुणेकरांच्या मनात निर्माण होत आहे.  


महत्वाच्या बातम्या