PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर शिवसेनेने कोणतीही भूमिका उघडपणे घेतलेली नाही. अशातच शिवसेनेचं मुखपत्र समजल्या जाणाऱ्या सामना वृत्तपत्रात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जाहिरात छापून आली आहे. 'सामना'च्या पहिल्या पानावर पंतप्रधान मोदी झळकल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. महाविकासआघाडीच्या सत्तेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध अन शिवसेनेची मात्र वेगळी भूमिका यातून दिसून आली. या जाहिरातीवरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 


शिवसेना-भाजप युती असतानादेखील 'सामना'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यात येत होते. शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेकडून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात होणाऱ्या टीकेची धार आणखीच वाढली. आता शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जाहिरात झळकली. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी 'गंदा है पर धंदा है' असं म्हणत ट्वीट केलं आहे.


 






 


शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईतील एका कार्यक्रमात याबाबत विचारले असता त्यांनी वृत्तपत्रात जाहिराती कुणाच्याही येवू शकतात, असे म्हणत थेट भाष्य करणे टाळले. पुणे भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जाहिरात प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. 


पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी


मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. 


सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले आहे. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. पंतप्रधानांनी गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी केले. त्यानंतर तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.