Amravati: अमरावती शहर पोलिसांच्या राजापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल 10 किलो सोनं आणि 5 लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा मुद्देमाल हवालाचा असल्याचा संशयपोलिसांकडून व्यक्त होत आहे.


राजापेठ पोलिसांना शनिवारी रात्री उशिरा गुप्त माहिती मिळाली की, बडनेरा मार्गावरील दसरा मैदान परिसरात असलेल्या कृष्णन अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक 401 मध्ये काही इसम सोनं आणि रोख रक्कम घेऊन आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजापेठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यासह पथकाने या इमारतीत धाड टाकली असता, फ्लॅट क्रमांक 401 मध्ये राजेंद्र सिंग भंवरसिंग राव (वय 38 वर्ष रा. सेवाली ता. राजसमंध, राजस्थान) गिरीराज जगदीशचंद्र सोनी (वय 22 वर्ष रा, वल्लभनगर, उदयपुर, राजस्थान) आणि अशोक सत्यनारायण खंडेलवाल (वय 24 वर्ष रा. गंगापुर जिल्हा भिलवाडा,राजस्थान) हे तीन इसम आढळून आले.


पोलिसांनी या तिघांकडून जवळपास 10 किलो सोन्याचे दागिने आणि सोन्याचे बिस्कीट ज्याची अंदाजे किंमत पाच कोटी रुपये असून 5 लाख 39 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय याठिकाणी हिशोबाच्या काही कच्च्या पावत्या देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण मुद्देमाला बाबत संबंधित इसमाना विचारले असता त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. सदर अपार्टमेंट हे रहिवाशी क्षेत्र असून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं ठेवण्यासाठी मनपाच्या बाजार परवाना विभागाची कुठलीही परवानगी संबंधित इसमांकडे नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद दिसत असून हे सोनं आणि पैसे हवाला रॅकेटचा एक भाग आहे का? या अनुषंगाने अमरावती पोलीस पुढील तपास करीत आहेत.


दरम्यान, ही संपुर्ण कारवाई राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुरेंद्र अहेरकर, पोलीस उपनिरीक्षक के. बी. मापारी व डी. बी. स्टाफ यांच्यासह दोन पंच व सराफ व्यावसायिक राकेश सुरेश कट्टा यांच्या उपस्थितीत करण्यात आली.