मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (30 मार्च) उशिरा रात्री पित्ताशयामध्ये (Gallbladder) अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली.
या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे. यासंदर्भात देखील डॉक्टर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी एक मोठा खडा अडकून बसला होता. ज्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे उद्या शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. त्यामुळे लगेच काही चाचण्या केल्यानंतर पित्तशयातील तो खडा दुर्बिणीद्वारे काढण्यात आला. या शस्त्रक्रियेला अर्धा तास लागला, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली. दरम्यान, या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या यकृतावरील ताण कमी होणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडी काविळ देखील झाली होती, ती देखील कमी होण्यास मदत होईल असं देखील ते म्हणालेत.
दरम्यान, शरद पवारांच्या पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार झाल्याने शस्रक्रिया करत त्यांचे पित्ताशय काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील शस्रक्रिया कधी करायची हे नंतर ठरवलं जाणार आहे. शरद पवारांना त्यांची प्रकृती बघून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दोन ते तीन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सध्या शरद पवारांची तब्येत स्थिर आहे.
गॉल ब्लॅडर स्टोन (Gallbladder Stone) कसा होतो?
गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय आणि यात खडे आढळल्यास त्याला गॉल ब्लॅडर स्टोन असे म्हणतात. यकृत म्हणजेच लिव्हरच्या खालच्या बाजूला पित्ताशय नावाची एक छोटी फुग्याच्या आकाराची पिशवी असते. जी जास्त तयार झालेलं पित्त साठवून ठेवण्याचं काम करत असते. आहारानंतर ठरावीक प्रमाणात पचनक्रियेसाठी पित्तरस लहान आतड्यात सोडला जात असतो. अतितेलकट पदार्थ खाल्ल्यास पित्तशयात छोटे छोटे खडे तयार होत असतात.