सातारा : सातारा जिल्ह्यातील बावधन बगाड यात्रा भरवल्या प्रकरणी वाई पोलिस ठाण्यात अडीच हजार बावधनकरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 83 जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना रात्री उशीरा वाई न्यायालयात हजर करण्यात आले असता वाई न्यायालयाने आज या सर्वांना पाच हजार रुपयांच्या अनामत रकमेवर जामीन दिला. जामीन दिला असला तरी रात्री उशीरापर्यंत या सर्वांना सोडण्यात आलेले नव्हते. पैसे भरुन घेण्याची आणि कागदोपत्री पुर्तता करण्याचे काम सुरु होते. उर्वरीत आरोपींच्या अटकेची कारवाई सुरुच राहणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे.


राज्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना यात सातारा जिल्हा देखील कमी नाही. सातारा जिल्ह्यातील आकडा देखील धडकी भरवणाराच आहे.  एका बाजूला कोरोनाचे आकडे वाढत असताना दुसऱ्या बाजूला तर साताऱ्यातील बगाडाची यात्रा हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता या गावातील लोकांना यात्रा भरवू नये असे आदेश देण्यात आले होते. मात्र ग्रामस्थांनी यात्रा भरवलीच. 


गावात सहा दिवसांपूर्वी बगाडाचा मान कुणाचा या साठी मंदिरात कौल लावला गेला. त्यावेळेला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रेच्या आदल्या रात्री नऊ वाजता शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत छबिना झाला. या सर्व सोहळ्याला पोलिसही उपस्थित होते. तर 2 एप्रिलला सुमारे 50 हजार लोक यात्रेत सहभागी झाले होते. 


असं सर्व चित्र असताना स्थानिक लोकप्रतिनिधींची अफलातून उत्तर आली होती. यात्रेची माहिती सर्वांना होती मात्र राज्याच्या गृह राज्य मंत्र्यांना आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मात्र मला नुकतच समजलं अशी प्रतिक्रिया दिली.