नवी दिल्ली : आधी जेपीसीबद्दल मोठं विधान आणि त्यानंतर थेट गौतम अदानींसोबत भेट, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या गेल्या काही दिवसांतल्या या दोन कृतींची चांगलीच चर्चा सुरु आहे. पण ही भेट होत असतानाच तृणमूल आणि शिवेसना खासदारांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र या मुद्द्यावर विरोधकांमधे सगळं काही आलबेल नाही हेच सांगणाऱ्या आहेत. 


इकडे शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची भेट झाली आणि त्याच दिवशी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांच्या अदानी विरोधाची धार आणखी तिखट झाली. दोघींच्या पक्षाची अदानींबद्दल भूमिका वेगळी असली तरी पवारांच्या भेटीनंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया खूप काही सांगणाऱ्या आहेत. अदानी पवार भेटीबद्दल पहिलं थेट वक्तव्य केलं ते तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी. त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलंय की,  अदानी हमाम में तो सारे ही नंगे है, ग्रेट मराठास सामोरं जायला मी घाबरत नाही. जुन्या संबंधांपेक्षा ते देशहिताला अधिक प्राधान्य देतील अशी आशा. आणि हो, माझं ट्वीट म्हणजे विरोधी एकजुटीच्या विरोधात आहे असा अर्थ काढू नका. ते जनहितासाठी आहे. 


अदानी यांच्याबाबत इतके सगळे प्रश्न निर्माण होत असताना, चौकशीची मागणी पूर्ण होईपर्यंत कुठल्याच राजकीय नेत्यानं त्यांना भेटलं नाही पाहिजे अशी भूमिकाही महुआ मोईत्रा यांनी मांडली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या एक घटक असलेल्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही त्याच दिवशी सेबीच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून चौकशीची आठवण करुन दिली. 


अदानी प्रकरणावर चौकशीसाठी शिवसेना खासदार आक्रमक


खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सेबीच्या चेअरमनला अदानी प्रकरणातल्या चौकशीची पुन्हा आठवण करुन दिली. सप्टेंबर 2021 मध्ये अदानी समूहातल्या काही कंपन्यांविरोधात सेबीनं चौकशी सुरु केली. पण अद्याप त्याचा अंतिम अहवाल आलेला नाहीय. लोकहितासाठी या चौकशीचं पुढे काय झालं, रिपोर्टमधून काय सापडलं हे समोर यायला पाहिजे. स्टॉक मॅन्युप्युलेशनचे जे आरोप या कंपनीवर होतायत त्याचंही सत्य समोर यायला हवं. 


शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्हीही पक्ष महाराष्ट्रातले, महाविकास आघाडीतले घटक. पण दोघांची अदानी प्रकरणातली भूमिका पूर्ण वेगळी आहे का असाही प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. उद्धव ठाकरे जाहीरपणेही अदानी प्रकरणात चौकशीची मागणी करत आलेत. 


शरद पवार आणि अदानी यांच्या कालच्या भेटीचं टायमिंगही इंटरेस्टिंग. वादाच्या केंद्रस्थानी असताना भेटल्यावर याची चर्चा होणार याची पुरेपूर कल्पना पवारांना असणारच. तरीही ही भेट इतक्या उघडपणे झाली. त्यामुळे त्यातून काही इशाराच पवार देऊ पाहत होते का असाही सवाल आहे. पवारांच्या या भेटीपाठोपाठ संजय राऊतांनीही ठाकरे- पवारांच्या तातडीनं गाठीभेटी केल्या. 


सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या वेगवेगळ्या चर्चा, अफवांना उधाण आलंय. भविष्यातल्या काही शक्यतांबाबत दबक्या आवाजात कुजबूज सुरु आहे. त्यातच अदानी- पवारांची भेट वेगवेगळ्या अँगलमधून महत्वाची ठरते. 


अदानी प्रकरणावर देशातल्या 19 विरोधी पक्षांची मागणी जेपीसी चौकशीची आहे. पण त्या मागणीतली हवा पवारांनीच काढून घेतली. ज्या मोदींसोबत अदानींचं सख्य असल्याची टीका होते, तेही इतक्या उघडपणे भेटताना दिसत नाही. पवार अदानी मात्र भेट अगदी उघड, बिनधास्तपणे झाली. कुठल्याही चर्चांची पर्वा न करता. साहजिकच आता विरोधी गोटात याचे कसे पडसाद उमटतायत हे पाहावं लागेल.