Sanjay Raut On Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो आहे. ते एखाद्या स्वीट डिशप्रमाणे आहेत. गोड माणूस आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. कोण संजय राऊत? असं म्हणत अजित पवार यांनी राऊतांवर हल्लाबोल केला होता. 'सामना'तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी अजित पवारांवर दबाव असल्याचं म्हणत, त्यांच्या भाजपसोबतच्या चर्चेवर भाष्य केलं होतं. त्यावर अजित पवारांनी आमची वकिली करु नका असं म्हटलं होतं. मग आजच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 


संजय राऊत म्हणाले, "अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही परवा एकत्र बसून जेवलो, छान जेवलो, अजित पवार स्वीट डिश, गोड माणूस आहे. अजित पवार रागावले असले तरी रागावू द्या. माणसाचे मन हलके होतं. पवार कुटुंबातल्या कुणाशी माझा वाद नव्हता, नाहीय.  अजित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ  आहेत."
 


पक्षाबद्दल नाही, महाविकास आघाडीबद्दल बोलणार


मी इतर पक्षां संदर्भात कधीही मत व्यक्त करत नाही. जोपर्यंत महाविकास आघाडीला तडे जात नाहीत, माझा संबंध महाविकास आघाडी म्हणून सगळ्या घटक पक्षांच्या समन्वयाचा आहे, त्यामुळे अंतर्गत पक्ष कोणीही असेल तर मी बोलेन, असं संजय राऊत म्हणाले. 


भाजपचा लावालावीचा डाव यशस्वी होणार नाही 


आम्ही परवा एकत्र जेवलो, त्यांना देखील माहिती आहे, एकच टेबलवर बसून जेवलो, मस्त जेवलो. अजित पवार स्वीट डिश आहेत, गोड माणूस आहे, त्यांना रागवूद्या, माणसाने मन मोकळे केले पाहिजे. पवार कुटुंबातल्या कोणत्याही घटकाशी माझा कधी वाद नव्हता, अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत, भारतीय जनता पक्ष जर लावालावी करत असेल तर त्यांना सांगतो त्यांचा डाव कधीही यशस्वी होणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.  


खारघरमध्ये 50 साधकांचा मृत्यू


खारघर येथील कार्यक्रमात काय झाले यासंदर्भात आम्ही बोलतो, तिथे 50 लोकांचे मृत्यू झाले, अजितदादा म्हणतात न्यायालयीन चौकशी व्हायला व्हावी मात्र त्याबरोबरच नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे विधानसभेचे अधिवेशन देखील घ्यायला हवे, असंही संजय राऊत म्हणाले. 


शिवसेना चौकट तोडूनच काम करते


उद्धव ठाकरे यांची जळगावातील पाचोरा इथं रविवारी सभा होत आहे. त्यावरुन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार असा इशारा संजय राऊत यांना दिला होता.  त्याबाबत संजय राऊत म्हणाले, "एक सिनेमा होता "केला इशारा जाता जाता", आता मी देखील एक इशारा देतो शिवसेना ही चौकट तोडूनच काम करते" 


अजित पवार काय म्हणाले होते? 


अजित पवारांनी पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊतांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, कोण संजय राऊत? असं अजित पावर म्हणाले. प्रत्येक प्रवक्त्यानं आपापल्या पक्षावर बोलावं, हे म्हणताना मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं, मग कुणाच्या अंगाला का लागावं, असंही अजित पवार म्हणाले.