मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. आता एक नवीन भन्नाट किस्सा समोर आला आहे. हा किस्सा सांगितलाय पत्रकार सुधीर भोंगळे यांनी. प्रसंग होता शरद पवारांवर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहाचा. अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'नेमकचि बोलणें' या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भोंगळे यांनी पवारांच्या 'ड्रायव्हिंग स्किल'चा एक किस्सा सांगितला. 


भोंगळेंनी सांगितलं की, एक दिवस पेरणे वाल्हे गोलाई परिसरात गारपीट झाली. तिथं मोठं नुकसान झालं होतं. शरद पवार त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्यांनी मला सकाळी सहा वाजता सर्किट हाऊसला बोलावलं. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे अर्थमंत्री होते. नुकसानबाधितांना कमी मदत मिळाल्यामुळं त्यांना पवारांनी फोन लावला आणि म्हटलं गरीबांची चेष्टा काय करताय, शेळी मेली तर 100 रुपए नुकसान भरपाई देताय. किमान हजार, दोन हजार तरी मदत करायची ना, असं पवारांनी शिंदे यांना सांगितलं असल्याचं भोंगळेंनी सांगितलं.



भोंगळे पुढे म्हणाले की, मग आम्ही घटना घडलेल्या ठिकाणी निघालो. तिथं काही कारणानं पवारांची गाडी जात नव्हती. मग एक 16 सीटरचा टेम्पो होता. तो जात होता. मग आम्ही त्या टेम्पोनं जायचं ठरवलं. स्वत: शरद पवारांनी टेम्पो चालवायला घेतला. मला म्हणाले पुढं बस माझ्यासोबत. इतक्या जोरात पवार साहेब टेम्पो चालवत होते की धडाधड टेम्पो उडत होता. आणि आमचं डोकं टपाला आदळत होतं. मी पवार साहेबांना म्हटलं की, अहो गाडी चालवताय का विमान चालवताय. तर ते म्हणाले की, पवारांना असल्या गाड्या हळू हळू चालवायला जमतच नाही. ते राज्य देखील असंच धडाक्यानं चालवत आले आहेत. महाविकास आघाडीची गाडी देखील ते अशीच चालवत आहेत आणि भविष्यातही चालवत राहतील, असं भोंगळे म्हणाले. हा किस्सा ऐकत असताना शरद पवार यांनी देखील हसून दाद दिली. 


यावेळी भोंगळे म्हणाले की, हे पुस्तक शरद पवार यांच्या भाषणांचा संग्रह आहे. हे पुस्तक म्हणजे भविष्यासाठी एक ठेवा आहे. काही दिवसांपूर्वी आप्पासाहेब पवारांवरील काही लिहिलं होतं. यातील काही चॅप्टर मी राजेंद्र पवारांना वाचून दाखवले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी म्हटलं की, आमचे वडील आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळलेत, असंही सुधीर भोंगळे यांनी सांगितलं.
 
पुस्तकाचं प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेना खासदार संजय राऊत, रंगनाथ पठारे, कवी किशोर कदम, सुधीर भोंगळे यांची उपस्थित होते. तर डॉ. विजय केळकर ऑनलाईन उपस्थित होते. तर शरद पवार, दिलीप वळसे, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे देखील हॉलमध्ये उपस्थित होते.