MIM Rally In Mumbai LIVE  : मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली औरंगाबादहून मुंबईच्या दिशेनं निघाली आहे. मात्र या रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम समजायचा अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय सभा आणि रॅलींना बंदी घालण्यात आलीय. त्यामुळं एमआयएमच्या रॅलीला मुंबईत एन्ट्री मिळणं कठीण दिसतंय. दरम्यान औरंगाबाद आणि अहमदनगर सीमेवर पोलिसांनी काही काळासाठी रॅली अडवली होती. मात्र अटी-शर्तींसह रॅलीतील काही वाहनं सोडण्यात आलीय.. 


रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक -खासदार इम्तियाज जलील
याबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला. हा विचित्र प्रकार आहे.  पोलिसांची परवानगी मिळाली आहे.  कुणी खोडा घालू नये म्हणून परवानगीची माहिती लपवली असल्याचंही ते म्हणाले. ज्या लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असंही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले. रॅलीला परवानगी घेतलेली आहे. त्यानंतर यावर निर्बंधाबाबत आमच्याकडे काहीही अधिकृत पत्र आलेलं नाही, असं जलील म्हणाले.


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी साधलेला संवाद 
प्रश्न -  नेमकी भूमिका काय आहे?
वळसे पाटील - पोलिसांनी मुंबईच्या संपूर्ण परिसरात कोणतीही रॅली किंवा सभा घेण्यासाठी बंदी घातली आहे, तसा आदेश काढलेला आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक संस्थांना तशा प्रकारचा कार्यक्रम घेता येणार नाही..


प्रश्न - काही गाड्यांसाठी परवानगी मिळाल्याचं कळतंय?
वळसे पाटील - स्थानिक प्रशासन त्या त्या विभागातील अधिकारी तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेतील,  त्याप्रमाणे परिस्थिती हाताळतील


प्रश्न -  एमआयएमची भूमिका अशी आहे की शांतताप्रिय मार्गाने येतोय आमची अडवणूक का?
वळसे पाटील- पोलिसांकडे माहिती असते त्या माहितीच्या आधारे पोलिस निर्णय घेत असतात, त्या संदर्भातच हा निर्णय पोलिसांनी घेतलेला असणार


प्रश्न - मुंबईत परवानगी असेल की नाही


वळसे पाटील- मुंबई पोलिसांनी जे आदेश काढले आहेत तोच अंतिम आहे असं समजायचं...