मुंबई : मुस्लिम आरक्षण (Muslim reservation)  आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून एमआयएम (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) आक्रमक झाले आहे. एमआयएमकडून आज औरंगाबाद-मुंबई रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही इम्तियाज जलील रॅली काढण्यावर ठाम आहेत.  कार्यकर्त्यांच्या 300 गाड्या मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे. आज संध्याकाळी मुंबईत असदुद्दीन ओवेसींची सभा आहे. या सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाही आहे. तरीही एमआयएम सभा घेण्यावर ठाम आहे.
 
MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील चांदिवली परिसरात रॅली होणार आहे. मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी ही रॅली काढण्यात येणार आहे  MIM ला सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे, अशी माहिती MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. आजच्या रॅलीसाठी औरंगाबादवरुन जवळपास 300 गाड्या मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. या रॅलीचं नेतृत्व MIM खासदार इम्तियाज जलील करत आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होतील. या रॅलीनंतर MIMचे अध्यक्ष  असदुद्दीन ओवेसींची सभा होणार आहे.  


कशासाठी आहे ही रॅली
मुस्लिम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे यासह अन्य मागण्यांसाठी  एमआयएमच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. राज्यातील सर्व विभागातून   तिरंगा रॅली मुंबईला येत आहे. औरंगाबाद शहरातून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 300 गाड्यांची रॅली तिरंगा ध्वज लावून आज सकाळी सात वाजता मुंबईकडे रवाना झाली आहे. आमखास मैदान औरंगाबाद येथून चारचाकी गाड्यांच्या ताफ्यासह अहमदनगर, पुणे, लोणावळा, पनवेल यामार्गाने मुंबईला येत आहे.  


रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक -खासदार इम्तियाज जलील
याबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला. हा विचित्र प्रकार आहे.  पोलिसांची परवानगी मिळाली आहे.  कुणी खोडा घालू नये म्हणून परवानगीची माहिती लपवली असल्याचंही ते म्हणाले. ज्या लोकांनी मुस्लिमांचा उपयोग करुन घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असंही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले.