पुणे : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? पवार काका पुतण्याचं मनोमिलन होणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात असे सवाल विचारले जात असतानाच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार पुण्यात एकत्र आले. निमित्त होतं वसंतदादा साखर संकुलात आयोजित एका बैठकीचं. या बैठकीत दोन्ही पवार एकत्र बसले होते. कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जातंय. पण या बैठकीनंतर शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांची आणखी एक बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमकी काय साखरपेरणी झाली? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
एप्रिल महिन्यात याच विषयावर चर्चा करण्यासाठी याच ठिकाणी दोन्ही नेते एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संभाव्य वापराबाबत दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी खल केला. अर्थात, या भेटीचं कागदोपत्री कारण काहीही असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र वेगळ्याच कारणासाठी या भेटीकडं पाहिलं जात आहे.
शरद पवार आणि अजित पवारांचा पक्ष एक होणार का, या प्रश्नाची चर्चा सध्या राज्यात सुरु आहे. या प्रश्नाचं उत्तर सध्या एआयकडे नाहीच, मात्र स्वतः शरद पवारांकडेही ते नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आलं होतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नावर आपल्याला त्याबद्दल माहिती नाही असं शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar-Ajit Pawar Meeting : बैठकीत काय साखरपेरणी झाली?
पुण्याच्या साखर संकुलात एआयच्या वापराबाबतची बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही पवार, जयंत पाटील यांच्यासोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीनंतर साखर संकुलात बंद दाराआड दोन्ही पवार आणि जयंत पाटील यांच्यात आणखी एक वेगळी बैठक पार पडल्याची माहिती आहे. जयंत पाटलांनी तसं झाल्याचं नाकारलं असलं तरी या बैठकीत नेमकी काय साखरपेरणी झाली असेल असा प्रश्न विचारला जात आहे.
यावेळी एकत्र येण्याची शक्यता जास्त
पवार काका-पुतणे एकत्र येण्याची चर्चा यापूर्वीही अनेकदा रंगली होती. मात्र यावेळी ही शक्यता अधिक गडद झाल्याचं चित्र आहे. असं होणं शक्य नाही, असं आत्मविश्वासानं सांगणारे शरद पवारांचे नेते यावेळी मात्र ताकही फुंकून पित असल्याचं चित्र आहे.
यावर त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार म्हणाले की, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे तसा अनेकांना पडला आहे. मात्र आजपर्यंत फक्त ही चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवरुन जर आम्हाला काही कळालं तर आम्ही समोरून येऊन नक्की सांगू."
एप्रिल महिन्यात पवार काका-पुतणे वेगवेगळ्या निमित्तानं तीन वेळा एकमेकांना भेटले होते. त्यानंतर आता पुन्हा या दोघांनी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे शेतीचा उत्पादकता वाढवता वाढवता हे दोन्ही नेते राजकीय उत्पादकताही वाढवणार का, याची उत्कंठा चांगलीच वाढली आहे.