पुणे :  पुण्यात संपूर्ण पवार कुटुंबीयांची भेट... एरवी हे फारसं वैशिष्ट्यपूर्ण वाटलं नसतं...  पण आता अजितदादा (Ajit Pawar)  शरद पवारांशी (Sharad Pawar)  फारकत घेत सत्तेत सहभागी झालेत. त्यामुळे पुन्हा भुवया उंचावल्या. पुण्यात प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार संपूर्ण कुटुंबीयांसह दिवाळीनिमित्त एकत्र आले. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar)  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.  माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात, अडचणी असतात वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते पण काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात, असंही पवार म्हणालेत.  


दिवाळीच्या पहिल्या दिवशी  बाणेरमध्ये प्रतापराव पवारांचं निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबीयांची भेट  झाली.   पवारांची दिवाळी एरवी बारामतीत गोविंद बागेत साजरी होते. यावर्षी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे  पवार कुटुंबाची एकत्र दिवाळी साजरी होणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  या कौटुंबीक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवारही दाखल झाले. कोर्टात राष्ट्रवादी कोणाची  यावरून दावे प्रतिदावे करणारे पवार काका आणि पुतण्या पुन्हा एकदा कुटुंबात एकत्र आले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. 


चोरडियांच्या निवासस्थानी देखील आले होते एकत्र


 पवार काका पुतण्या एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही.  पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात  एकमेकांच्या नजरेला नजरही न देणारे हे काका पुतणे  पुण्यात 13  ऑगस्टला उद्योजक चोरडियांच्या निवासस्थानी एकत्र आले. ही बैठक तब्बल साडेतीन तास चालली. 


राजकीय चर्चा नाही


गेल्या काही दिवसांपासून अजित पवार डेंग्यूमुळे आजारी आहेत. मंत्रिमंडळ बैठक असो, प्रदूषण विषयक बैठक असोकिंवा अन्य कोणतेही शासकीय कार्यक्रम अजित पवार या बैठकांपासून दूर आहेत. मात्र प्रतापरावांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात  अजित पवार आवर्जून उपस्थित होते. अर्थात  या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही  हे सांगायला पवार कुटुंबातले कोणीच विसरले नाहीत. 


पवार कुटुंबियांची एकत्र भेट आणि दादांची दिल्लीवारी..


पवार कुटुंबाची दिवाळी हा संपूर्णपणे कौटुंबीक व्यवहार असला तरी त्यातून राजकारणाचे आखाडे खेळले जातात हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. पण या दिवाळी सेलिब्रेशननंतर दादांनी धरलेली दिल्लीची वाट ही जास्त आश्चर्यकारक आहे. पवार कुटुंबाचं पुण्यात झालेलं गेटटुगेदर त्यात काका पुतण्यांची झालेली एकत्र भेट आणि दादांची दिल्लीवारी... एकीकडे दिवाळीत मंत्र्यांना वाद नको असं मुख्यमंत्री सांगत असतानाच  दादा दिल्लीत गेल्यामुळे दिवाळीत राजकीय फटाके फुटतात की काय हे बघावं लागेल. 


काय म्हणाले शरद पवार पाहा व्हिडीओ :



हे ही वाचा :


ठाण्याच्या मुंब्य्रात शाखेवरून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद चिघळणार, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जमाव बंदीचे आदेश