मुंबई: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणावरुन (Maratha reservation) घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर, आता महायुतीतील नेत्यांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. छगन भुजबळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लक्ष घालावं, अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी घेतली. सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं. पुढच्या दाराने आरक्षण मिळत नाही, त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) म्हणजे मागच्या दारातून वाट मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसंच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना न्यायाधीश जाऊन भेटतात त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही असंही भुजबळ म्हणाले होते.  त्याला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं.


शंभूराज देसाई म्हणाले, "काल आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे आश्चर्यकारक वक्तव्य केले. ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे हे मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट झाले आहे. अचानक भुजबळ यांनी असे वक्तव्य केले त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे"


ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही


ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही कुठलाही धक्का लावणार नाही. कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यप्रणाली निश्चित झाली आहे. कॅबिनेट बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली. जर कुणबी प्रमाणपत्र कुणाकडे असेल ते व्हेरिफाय करावे सर्व कागदपत्र तपासावी आणि प्रमाणपत्र द्यावे असे ठरले, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.  


भुजबळांकडून संभ्रम 


उद्या मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीपूर्वी आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालू. मी काही तरी केलं आणि तुमचं थांबवले असे भुजबळ यांना दाखवायचं आहे का? असा संभ्रम ते करत आहेत की काय? त्यांनी केलेल वक्तव्य अयोग्य आहे, असं शंभूराज देसाईंनी नमूद केलं. 


ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही 


आम्ही अजित दादा, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बोलणार आहोत. ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. ओबीसींचे काढून आम्ही आरक्षण देणार असा विचारच आमच्या मनात नाही, असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं.


भुजबळांची नेहमीच भडक वक्तव्ये 


भुजबळ यांचे वक्तव्य बिलकुल योग्य नाही. तुमचे काय म्हणणे आहे ते तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे  मांडा, असे माध्यमांवर बोलू नका. भडक वक्तव्ये करणारी भूमिका भुजबळ यांची नेहमीची असते. पण आता त्यांनी असे करू नये. अजितदादा यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही अजितदादांना उद्या भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की अशी वक्तव्य करू नये, अशी आक्रमक भूमिका शंभूराज देसाईंनी घेतली.



इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : भुजबळ म्हणाले, जरांगेंना सर सर म्हणणाऱ्या न्यायमूर्तींकडे अपेक्षा नाही, आता मनोज जरांगेंची 4 शब्दात प्रतिक्रिया