मुंबई : पुढची किमान दोन ते तीन वर्ष कोरोनासोबत राहावं लागेल. सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केलं आहे. लस संशोधनातील 'भीष्माचार्य' असं डॉ. सुरेश जाधव यांना म्हटलं जातं. ते आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. सध्या ज्या लशींना मान्यता मिळाली आहे, त्या लशी कोरोनाच्या नव्या विषाणूशी लढण्यास सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलंय. 18 वर्षांवरील वयोगटासाठी आतापर्यंत झालेल्या ट्रायल्स झाल्या आहेत, त्यामुळं शाळकरी मुलांना ही लस सध्यातरी देता येणार नाही. देशातील किमान 70 टक्के लोकांचं लसीकरण झाल्याशिवाय मास्क वापरणं बंद करता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.


डॉ. सुरेश जाधव म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोना आला त्यावेळी बरीच माहिती बाहेर आली आहे. चीनमध्ये वृत्तपत्रावर बरीच बंधन आहेत, त्यामुळं ही माहिती बाहेर उशीरा आली. नंतर WHO नं नवीन रोग आल्याचं जाहीर केलं. विमानानं माणसंच नाही तर रोगही प्रवास करतात. तसंच कोरोनाबाबत झालं. हळू हळू सर्वच देशात कोरोना पसरला आणि तो जागतिक महामारी घोषित करावी लागली, असं जाधव म्हणाले.


डॉ. जाधव म्हणाले की, आतापर्यंतच्या अभ्यासावरुन 18 वर्षावरील लोकांवर ट्रायल झाली आहे. त्यामुळं 18 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तिला लस दिली जाणार नाही. या वयोगटाच्या लोकांनी लस घेऊ नये. रोगाचा प्रादुर्भाव हा 55 वर्ष आणि वरील लोकांमध्ये जास्त आहे, याच गटात मृत्यूदर जास्त आहे. लहान बाळ आणि मुलांमध्ये फार कमी प्रादुर्भाव आहे. कोरोनाचे वाईट परिणाम या गटात कमी आहेत. लहान मुलांमध्ये जर लसीकरणाचा वेगळा परिणाम झाला तर त्याचा परिणाम सर्व लसीकरणावर होईल. फायझर कंपनीनं या वयोगटासाठी स्टडी सुरु केला आहे. तो लवकरच पूर्ण होईल, असं जाधव यांनी सांगितलं.


मलेरियावरील लस लवकरच येणार


डॉ. सुरेश जाधव म्हणाले की, ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत आम्ही पाच वर्षापासून संपर्कात होतो. मलेरियावर लसीसाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो. 50 वर्षांपासून जगभरात 50 बिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. मात्र अद्याप त्यावर लस नाही. एक लस तयार झाली मात्र त्याची उपयुक्तता 30 टक्केच होती. म्हणून जास्त प्रभावी लस करण्यासाठी सीरम आणि ऑक्सफर्डमध्ये करार झाला. आता ही लस तिसऱ्या टप्प्यात आहे. पुढच्या दोन वर्षात या लसी लायसेन्स उपलब्ध होईल, असं जाधव म्हणाले.