मुंबई : दोन आयुक्तांनी प्रश्न सुटत असतील तर राज्यात दहा मुख्यमंत्री पाहिजेत, असा टोला भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांना लगावला आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, मुंबईत दोन आयुक्त करून प्रश्न सुटणार आहेत का? मुंबईकरांचे प्रश्न सुटले पाहिजेत. दोन आयुक्त केल्याने प्रश्न सुटत असतील तर मग राज्यात दहा मुख्यमंत्री करायला पाहिजे, असं ते म्हणाले.


सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी नामांतराबद्दल भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नामांतराबद्दल 4 मार्च 2020 रोजी राज्य सरकारने एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला. त्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला नाही. बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी नामांतर करण्याची मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली त्याचे स्वागत करतो. ठाकरे सरकारने 23 जानेवारीला नामांतराची घोषणा करावी, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त गरजेचे, काँग्रेसच्या अस्लम शेख यांची मागणी


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे, अशी मागणी मंत्री स्लम शेख यांनी नगर विकास विभागाकडे केली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतु सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरीकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.  शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयात यावे लागते नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचे आहे. पी-उत्तर वॉर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्तांची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पदं निर्माण करावीत, अशी मागणी अस्लम शेख यांनी आहे.


मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा भाजपा यशस्वी होऊ देणार नाही - अतुल भातखळकर


अस्लम शेख यांची मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षड्यंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे, अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अस्लम शेख मागील 11 वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असलेल्या मालाडमधील नागरिकांना महानगरपालिकेच्या संदर्भातील कामे करण्यासाठी होत असलेली अडचण दूर व्हावी या करिता कधीही प्रयत्न करावेसे वाटले नाहीत. परंतु मी आमदार झाल्यापासून मालाड पूर्व, कुरार गाव, दिंडोशी येथील नागरिकांचे हेलपाटे थांबावे याकरिता वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा यासाठी सतत पाठपुरावा करत होतो, माझ्या मागणीवरून मुंबई मनपाच्या पी/उत्तर वार्ड चे विभाजन करून पी/पूर्व व पी/पश्चिम असे दोन प्रशासकीय प्रभाग करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे.


या पोटशूळातून असलम शेख यांनी आता मुंबईसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. याआडून मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा जो डाव आहे तो भारतीय जनता पक्ष कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास मुंबई भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने कायमच राजकारण करणाऱ्या शिवसेनेची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असलम शेख यांच्या या वक्तव्याविषयीची भूमिका काय आहे? असा प्रश्न सुद्धा अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.