सोलापूर: मध्यप्रदेश येथील बहोरीबंद तालुक्यातील धनवाही गावातील काही कामगार सोलापुरात अडकल्याची तक्रार तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या कामगारांना सोलापूरमध्ये बंधक बनवलं गेलंय का अशी शंका आल्याने त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश बहोरीबंदचे एसडीएम रोहित सिसोनिया यांना दिले. रोहित सिसोनिया यांनी ही माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना दिली. 6 जानेवारी रोजी संध्याकाळी तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तेजस्वी सातपुते आणि ग्रामीण पोलिसांच्या टीमने या कामगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली.



मध्यप्रदेशच्या कटनीमधील धनवाही गावातील काही कामगार, त्यांची मुलं अशी एकूण 52 जण सोलापुरातील मंद्रुप येथे अडकून होती. कामगारांना काम मिळवून देण्याचं आश्वासन देऊन ठेकेदारानी त्यांना सोलापूरमध्ये आणलं होतं. त्यानंतर त्यांना ऊस तोडणीसाठी सोलापूरमधील मंद्रुप येथे नेण्यात आले. मात्र कामात कुशल नसल्याने त्यांना ऊसतोडणी करता येत नव्हती. त्यामुळे त्यांना परत आपल्या गावी जायची इच्छा व्यक्त केली.  मात्र परत जाण्यासाठी कामगारांकडे पैसे नव्हते तर दुसरीकडे मालकाने आधीच खर्च करून कामगारांना आणलं होतं. जितका खर्च करुन कामगारांना आणलं तितक्या पैशाचे काम देखील त्यांनी केलं नव्हतं. आता पुन्हा परत पाठवण्यासाठी लागणारे पैसे नसल्याने हे कामगार इथेच अडकून पडले होते.


या सर्व कामगारांना अधिक्षक तेजस्वी सातपुते आणि ग्रामीण पोलिसांच्या टीमने आधी पोलिस स्टेशनला बोलवून घेतलं. त्यांची व्यथा ऐकल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. यावेळी पोलिसांनी संबंधित ठेकेदार आणि मालकालादेखील पोलिस स्थानकात बोलवून त्यांचं समुपदेशन केलं. जितकं काम झाल तितकी मजुरी देण्यास सांगितली. उर्वरित पैसे दानशूरकडून जमा करून या मजुरांना मध्यप्रदेशसाठी रवाना करण्यात आलं आहे. अवघ्या 24 तासाच्या सोलापूर पोलिस आणि कटनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीचा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ट्वीट करून अभिनंदन केले आहे.




आपल्या घरी परतणाऱ्या कामगारांसाठी पोलिसांनी दिली शिदोरी आणि मायेची ऊब

कामाच्या शोधात आलेले हे सर्व कामगार अत्यंत गरीब होते. कित्येकांकडे पांघरण्यासाठी साधी चादर देखील नव्हती, सोबत लहान मुलं होती. अशा परिस्थितीत जवळपास 980 किलोमीटरचा प्रवास त्यांना करायचा होता. पोलिसांना परिस्थिती पाहून सर्व कामगारांसाठी प्रवासात लागणाऱ्या शिदोरीची व्यवस्था देखील केली. जेवण, पाणीसह सॅनिटायझर देखील या कामगारांना उपलब्ध करुन देण्यात आलं. सोबतच थंडी पासून वाचण्यासाठी सोलापूरी चादर देखील उपलब्ध करून देण्यात आली. कामाच्या शोधात आलेले कामगार रिकाम्या हाताने परतू नयेत म्हणून काही आर्थिक स्वरुपात मदत देखील पोलिसांनी त्यांनी उपलब्ध करून दिली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या 24 तासाच्या आत सर्व कामगारांना त्यांच्या घरी रवाना केले. आज पहाटेच्या सुमारास हे सर्व कामगार सुखरूप आपल्या घरी पोहोचल्याची माहिती पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. सोलापूर पोलिसांनी केलेल्या या कार्याचं मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केलं आहे.