हायटेक चोर! गुगल मॅपच्या मदतीनं रेकी, मग घरफोड्या, सात राज्यात धुमाकूळ घालणारी टोळी नंदुरबारमध्ये जेरबंद
नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
नंदुरबार : दिवाळीच्या काळात नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. नंदुरबार शहरात घरफोडी करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला होता. मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले होते. पोलिसांना त्यांच्या जप्त केलेल्या गाडीतून मिळालेल्या कागदपत्रांवरून तपास केला आणि आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद केली. त्यांच्याकडून 13 लाख 14 हजार 582 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील दोघे आरोपी मध्यप्रदेशमधील असून ते पुण्यात वास्तव्याला होते.
नंदुरबार शहरात दिवाळी काळात बंद घरांची रेकी करुन त्यांची घरफोडी करणाऱ्या टोळीने थेट पोलिसांच्या नाकात दम आणला होता. या टोळीने दिवसाढवळ्या घरफोड्या करुन पोलिसांना थेट आव्हानच दिलं होतं. दरम्यान 10 नोव्हेंबरला घरफोडी करुन पसार होणाऱ्या या टोळीचा पोलीसांनी पाठलाग करुन त्यांच्या वाहनाला सारंगखेडा येथे धडक देऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीची वेळ आणि शेताचा सहारा घेत हे घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांनी पोबारा केला होता त्यानंतर पोलीस पथकाला त्यांचे वाहन मिळून आले होते.
पोलिसांनी आरोपींना जेरबंद कसं केलं?
पोलीस आपल्या मार्गावर असल्याचे पाहून आरोपींनी शेताचा आसरा घेतला आणि तिथून पुणे गाठलं. मात्र आपलं वाहन सोडून गेल्याने त्यात आढळलेल्या काही कागदपत्रांच्या आधारावर नंदुरबार पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू ठेवली. आरोपी पळून गेले पण त्यांची गाडी पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांना या गाडीत चोरांच्या लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळालं. याच प्रमाणपत्राचा तपास करताना आरोपींचा छडा लावण्यासाठी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन टीम रवाना केल्या होत्या. अखेर सलग 15 दिवस मध्यप्रदेशमधील इंदोर आणि पुणे येथे तळ ठोकल्यानंतर या अट्टल चोरांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.
शैलेंद्र विश्वकर्मा आणि संतोष सिंह असे या घरफोडी करणाऱ्यांची नावे आहेत. यातील शैलेंद्र विश्वकर्मावर मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तेलांगणा राज्यात घरफोडीचे 63 गुन्हे दाखल आहेत. तर संतोष सिंह हा खुनाच्या गुन्हात 14 वर्षांची शिक्षा भोगून आलेला आहे. या आरोपींकडून चार घरफोडीतील 13 लाख 77 हजार 335 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
सात राज्यातील गुन्हे उघड येण्याची शक्यता
या गुन्ह्यातील आरोपी वेगवेगळ्या राज्यात जाऊन दिवसा घरफोड्या करायचे पोलिसांनी अटक केल्याने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि दिल्लीमधील गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केले आहे. एकूणच नंदुरबार पोलिसांनीही मोठी कामगिरी केली असून त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी आज या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बक्षीस जाहीर केले आहे. तसेच ज्या नागरिक आणि व्यापाऱ्यांना शक्य आहे त्यांनी तरी आपल्या घर, व्यापारी प्रतिष्ठाणांबाहेर सीसीटीव्ही लावावे, असे आवाहन त्यांनी केले.