Air India : गेल्या काही महिन्यांत विमानात लघुशंका करणे आणि केबिन क्रूसोबत गैरवर्तनापासून ते मद्यधुंद अवस्थेतील प्रकाराची डझनभर प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, विमानातील अशीच आणखी एक घटना पुन्हा समोर आली आहे. एका महिलेला विमानात डास नाही तर चक्क विंचू (Scorpio) चावल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाने (Air India) 23 एप्रिल रोजी ही घटना घडली असल्याचं स्पष्ट केलं आहे.


नक्की काय घडलं? 


23 एप्रिल रोजी नागपूर (Nagpur) वरुन एअर इंडियाच्या AI 630 या विमानाने (Flight) मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. या विमानात अनेक प्रवासी होते. त्यातल्या एका प्रवासी महिलेला विंचू चावला. तातडीने त्या महिलेला विमानतळावर उतरल्यावर डॉक्टरांकडे  नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात उपचार केले अशी माहिती एअर इंडियाने शनिवारी दिली. 


एअर इंडियाने मागितली प्रवाशांची माफी


यावर स्पष्टीकरण देत एअरलाइन ने सांगितले की,  त्यांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केले आहे. तसेच विमानाची संपूर्ण तपासणी देखील  केली तेव्हा त्यांना तो विंचू सापडला.  त्यानंतर विमानाची योग्य ती स्वच्छता केली. या घटनेनंतर, एअर इंडियाने विमानामध्ये योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विमानात स्वच्छता ठेवण्यासाठी  आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया देखील करण्यास सांगितले आहे. तसेच या घटनेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला त्यामुळे एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. 


यापूर्वी देखील विमानात असे प्राणी सापडण्याची घटना घडली होती


विमानात सापडला होता साप


एअर इंडियाच्या एक्सप्रेस प्लेनच्या कार्गो होल्डमध्ये गेल्या वर्षी साप सापडला होता.  डिसेंबरमध्ये कालिकतहून एअर इंडिया एक्सप्रेसचे B737-800 हे विमान दुबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला होता.  डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई विमानतळावर पोहोचल्यावर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला आणि विमानतळ अग्निशमन सेवांनाही याची माहिती देण्यात आली. त्यावेळी दुबई विमानतळावर प्रवाशांचा बराच वेळ खोळंबा झाला होता. तेव्हा एका संतप्त प्रवाशाने दुबई विमानतळावरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. 


 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Manipur : मणिपूर: हिंसाचारात 54 जण ठार; परिस्थिती लष्कराच्या नियंत्रणात, इंफाळमध्ये जनजीवन पूर्वपदावर