Manipur Violence: आदिवासी-बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षात मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार (Manipur Violence) उफाळून आला. मागील काही दिवसपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 54 जण ठार झाले असल्याचे वृत्त पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. हिंसाचाराला अटकाव करण्यासाठी आणि राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला उतरवण्यात आले आहे. लष्कराने परिस्थिती नियंत्रणात आणली असून राजधानी इंफाळमधील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. 


पीटीआयच्या वृत्तानुसार, 54 मृतांमधील 16 मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयातीत शवागारात ठेवण्यात आले आहे. तर, 15 जणांचे मृतदेह इंफाळमधील जवाहरलाल नेहरू आयुर्विज्ञान संस्थानात ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय, इंफाळ पश्चिमच्या लाम्फेलमधील रुग्णालयात 23 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवळपास 10 हजार जवान तैनात करण्यात आले होते. 


पीटीआयच्या वृत्तानुसार, आदिवासी-बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षात जवळपास 100 हून अधिक जखमी झाले आहेत. मात्र, या हिंसाचारातील मृतांबाबत आणि जखमींबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती दिली जात नाही. दंगलीत जखमी झालेले, गोळी लागून जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. 


13 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले 


लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हिंसाचारग्रस्त भागात अडकलेल्या जवळपास 13 हजार लोकांना लष्कराने सुरक्षित स्थळी हलवले. या लोकांना लष्कराच्या शिबीरात दाखल करण्यात आले. हिंसाचाराची ठिणगी पडल्यानंतर लष्कर आणि सुरक्षा दलाने तातडीने हालचाली केली. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणांहून लोकांना वाचवण्यास यश आले. चुराचांदपूर, कांगपोकपी, मोरेह आणि काकचिंगमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.


इंफाळ खोऱ्यात परिस्थिती सामान्य 


हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या तुकड्या, जलद कृती दल आणि केंद्रीय पोलिस दल इम्फाळ खोऱ्यातील सर्व प्रमुख भाग आणि रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार आता, इंफाळ खोऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. जनजीवन सामान्य होऊ लागले आहे. 


शनिवारी इंफाळमधील दुकाने आणि बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. लोकांकडून दुकानात खरेदी सुरू असून रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. गुरुवारी-शुक्रवारी रात्री इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये जाळपोळीच्या तुरळक घटना घडल्या. हल्लेखोरांनी नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा दलांनी परिस्थिती चिघळण्यापासून रोखली. 


आयकर अधिकारी, कोब्रा कमांडो ठार


मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आयकर विभागाचे भारतीय महसूल सेवेतील एका अधिकाऱ्याला त्याच्या घरातून जमावाने ओढून बाहेर नेत हत्या केली. मिन्थांग हाओकिप यांना इंफाळमध्ये कर सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.


मणिपूरच्या चुराचंदपूर येथील आपल्या गावात सुट्टीवर गेलेल्या सीआरपीएफ कोब्रा कमांडोची शुक्रवारी सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 204 व्या कोब्रा बटालियनच्या डेल्टा कंपनीचे कॉन्स्टेबल चोंखोलेन हाओकीप यांची दुपारी हत्या झाल्याचे वृत्त आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: