Aaditya Thackeray: सध्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणातील घडामोडी या दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. शरद पवारांचा राजीनामा, अजित पवार यांच्या चर्चा अशा अनेक घडामोडी सध्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चेत आहेत. या संपूर्ण घडामोडींवर राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील महत्त्वाच्या ठरत आहेत. माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज माथेरानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. महाविकास आघाडी ही देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आली असल्याचं म्हटलं. जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील, असेही त्यांनी म्हटले. आज माथेरान दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackarey) माध्यमांशी संवाद साधला.
'या आव्हानाला आम्ही जास्त महत्व देत नाही'
सध्या बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीचा वाद चांगलाच पेटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे देखील बारसूच्या दौऱ्यावर आहेत. त्यातचं उद्धव ठाकरे यांनी कोकणामध्ये येऊन दाखवावं असं आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलं होतं. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'या आव्हानाला आम्ही जास्त महत्व देत नाही. सभेला परवानगी नाकारणे ही जशी हुकूमशाही दादागिरी हे घटनाबाह्य सरकार तिथल्या नागरिकांवर करते, ती आमच्यावरही दाखवत आहेत. मुळात प्रश्न हाच राहतो की इतका चांगला प्रकल्प असेल तर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्याची काय गरज आहे? पालघरमध्ये आदिवासी महिलांना घराबाहेर काढलं गेलं. बारसूमध्ये असं होतंय. अनेक ठिकाणी ही हुकूमशाही आपल्याला आता दिसते. ही राजवट हुकूमशाहीची आहे'.
'मुख्यमंत्री कोण होणार या सध्या चर्चा नाहीत'
अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना आदित्य ठाकरेंनी या चर्चा सध्या मविआत नाहीत. जसे गद्दार खुर्चीसाठी एकत्र येतात तसे आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलो नाही, असेही आदित्य यांनी स्पष्ट केले.
'गुलाबरावांची सातच्या आधीची आणि नंतरची वक्तव्य वेगळी असतात'
गुलाबराव पाटलांवर टीका करत, 'गुलाबराव पाटील यांची वक्तव्ये ही सातच्या आधीची आणि सातच्या नंतरची वेगवेगळी असतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच आता ज्या काही बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, त्यापूर्वी विधान परिषद असेल, यामध्ये महाविकास आघाडीला जे काही यश मिळालं आहे आणि मिळणार आहे. त्यामुळे राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या निवडणुका होऊ देत नाहीत. त्यामुळे आता संविधान आणि लोकशाही धोक्यात आल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे हे माथेरानच्या दौऱ्यावर होते. तसेच माथेरानच्या विकास कामांचा देखील त्यांनी आढावा घेतला.