मुंबई : राज्यभरात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं शाळा कधी सुरु होणार हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या समोर आहे. यातच एक महत्वाची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा  4 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. या दोन जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन वगळता 4 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार आहेत.


विजय वडेट्टीवार म्हणाले की, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने आहेत. 90 टक्के पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. त्यामुळं या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही.  त्यामुळे गरीब आदिवासी मुलांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

शाळा सुरु करताना नियमावली देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी ठिकाणी शाळा सुरू होणार आहेत. शाळामध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल, त्यांना मास्क उपलब्ध करून दिले जातील, अंतरावर बसवले जाईल, शाळा सॅनिटाईझ केल्या जातील, असं ते म्हणाले. जिथे कंटेन्मेंट झोन आहे तिथे मात्र शाळा सुरू होणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून दूरदर्शनवर 'टिलीमिली' आनंददायी शिक्षण

गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्के शाळा सुरू होतील, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शाळा सुरू होतील, असं ते म्हणाले.

दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या 4 ऑगस्ट रोजी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे.


निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी  केंद्राला 1 हजार 65 कोटीचा प्रस्ताव

निसर्ग चक्रीवादळसाठी राज्य सरकारने केंद्राला 1 हजार 65 कोटींच्या नुकसान भरपाई साठी प्रस्ताव पाठवला असल्याचे यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले. 18 जुलै रोजी राज्य सरकारने केंद्राला याबाबत पत्र पाठवले असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. NDRF च्या निकषानुसार प्राथमिक मागणी केली आहे. विरोधकांचं आरोप करणं काम आहे.  त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. फडणवीस यांना विनंती करायची आहे त्यांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी. त्यांनीही परिस्थिती पाहिली आहे, ते मदत करतील अशी अपेक्षा आहे, असं देखील वडेट्टीवार म्हणाले.

संबंधित बातम्या