दूध उत्पादकांना किमान दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला भाव द्यावा, यासह विवीध मागण्यांसाठी शिवसंग्राम, भाजप आणि महायुतीचे घटकपक्ष यांच्या माध्यमातून राज्यभर आज केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. जिल्हा तालुका स्तरावर प्रतिकात्मक आंदोलन करून जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन आणि दूध पिशवीची भेट दिली जाणार आहे, जर या मागणीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाहीतर 1 ऑगस्टला तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेन मंगळवारी दूध बंद आंदोलन पुकारले आहे.
दूध संकलन वाढवावे, भाजपकडून शासनाला निवेदन
कोरोना काळात दुधाचा खाजगी खप कमी झाला आहे, त्यातच सहकारी दुग्ध संघ दुधाची कमी खरेदी करत आहे. मंत्र्यांच्या डेअरीचे दूध प्राधान्याने खरेदी केले जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडचे दूध विक्रीविना राहत असून शेतकऱ्यांना नुकसान होत आहे, असं भाजपनं म्हटलं आहे. गायीच्या दुधाला 10 रुपये तर भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावं, तर 30 रुपये लिटर दराने शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी व्हावी यासाठी भाजपने निवेदन दिले. शासनाने ऐकले नाही तर 1 ऑगस्ट रोजी राज्य व्यापी दूध संकलन बंद आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील उपविभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी संघर्ष समितीचं आंदोलन
अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला. यावेळी डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे हे उपस्थित होते. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार असल्याचं अजित नवले यावेळी म्हणाले. दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचे नियोजन केले असल्याचे नवले यांनी सांगितले.
भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही- बाळासाहेब थोरात
भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, असं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. त्यांचं सरकार असताना तीन वर्षे कठीण गेली. शेतकरी तेव्हा आंदोलन करत होते, त्यावेळी भाजपने दखल घेतली नव्हती. शेवटी कुठे त्यांनी थोडी मदत केली. गेले चार महिन्यापासून आम्ही पावडर करण्याचा निर्णय घेतला. त्यात चारशे ते पाचशे कोटी शासनाने खर्च केला अजूनही खर्च आवश्यक असेल तर सरकार करेल, असं थोरात म्हणाले.
उद्या मंत्रालयात बैठक
दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्री, शेतकरी संघटनेचे काही प्रतिनिधी तसंच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. मंत्रालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होणार आहे.
गोकूळ दूध संघावर कारवाईचा इशारा
मंगळवारी दूध संकलन बंद ठेऊन राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून गोकूळ दूध संघावर कारवाईचा इशारा दिला आहे. दूधाला पाच रुपये अनुदान देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला 'गोकुळ'ने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर दुग्ध विभागाच्या उपनिबंधकांनी गोकुळला नोटीस बजावली आहे. दूध संकलन बंद ठेवल्यास सहकार कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.