Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला आहे. ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं याप्रकरणी ताताडीचा दिलासा नाकारल्याच्या निर्णयाला नवाब मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत तातडीच्या सुटकेची मागणी केली होती. मलिकांच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. नवाब मलिकांच्यावतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. मात्र, 'याप्रकरणी तपास अद्याप सुरू असल्यानं तूर्तास यात सध्या हस्तक्षेप करू इच्छित नाही, तुम्ही नियमित कोर्टात रितसर जामीनासाठी अर्ज करू शकता'. असं स्पष्ट करत ही याचिका ऐकण्यासच नकार देत ती फेटाळून लावली.


दरम्यान मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करत पुढील सुनावणी 6 मेपर्यंत तहकूब केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली आहे. मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हायकोर्टानं याप्रकरणी दिलासा देण्यास नकार दिल्याला मलिकांनी सर्वोच्च कोर्टात आव्हान दिलं होतं. मलिकांसाठी जमेची बाजू म्हणजे तपासयंत्रणेनं त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. गुरूवारी ईडीनं मलिकांविरोधात 5 हजार पानांचं आरोपपत्र कोर्टात सादर केलं आहे, यात 9 खंड असल्याची माहिती आहे. या आरोपपत्रावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याची प्रत आरोपीला लवकरात लवकर देण्याचे निर्देश पीएमएलए कोर्टानं दिले आहेत.


'ईडी'ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे 'ईडी'ला तपासात आढळलं आहे. त्यानुसार 'ईडी'नं कारवाई करत मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली. याआधी न्यायालयाने मलिक यांना 'ईडी' कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपत असल्यानं मलिक यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालायातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. आपल्याला सध्या मुत्रपिंडाचा (किडणी) त्रास असून त्यामुळे पायाला सूज आल्याची माहिती मलिक यांनी कोर्टाला दिली आहे. तसेच पाय दुखत असल्याचे कारागृह प्रशासनाला सांगितले असता वेदनाशामक (पेनकिलर) औषधे दिली जातात. मात्र, या आजारावर कायमस्वरुपी उपाय करणं आवश्यक असल्याचंही मलिक यांनी कोर्टाला कळवलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


नारायण राणेंना हायकोर्टाचा आणखी एक दिलासा; 'या' प्रकरणात मिळाला अटकेपासून अंतरीम दिलासा