सातारा : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना, अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरुन या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावत आहेत. मात्र सीमेवर देशाचं रक्षण करणारे जवानही आता मागे हटलेले नाहीत.


 

साताऱ्यातील खटाव-माण तालुक्यात आजी-माजी सैनिक संघटनांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून, दुष्काळग्रस्तांसाठी जलसंधारणाची कामं सुरु केली आहेत.

 

'जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा जयघोष करत भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी खटाव तालुक्यातील नेर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ आपल्या डोजरच्या माध्यमातून केला.

 

जवानांनी रणगाडासदृश्य डोजरच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं हाती घेतली. जवानांनी खटाव-माण परिसरातील तलाव, विहीरीतील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला.

 

खटाव तालुक्यातील नेर धरणातील गाळ उपसण्यासाठी चक्क भारतीय सैन्यदलाची तुकडी आपल्या अवजारे वाहणांसह धरणात उतरली.

 

सातारा जिल्ह्यातील अनेक गावात जवळपास प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यात आहे. या भागातील निवृत्त सैनिकांनी पुढाकार घेऊन दुष्काळ कायमचा हटवण्याचा निर्धार केला. त्यांनी सर्वात आधी सैन्यदलाशी संपर्क साधला आणि नेर धरणातील गाळ काढण्यासाठी मदत मागितली.

 

मग सातारकरांच्या या हाकेला सैन्यदल धावून आलं. शस्त्रसज्ज जवानांनी साताऱ्याकडे धाव घेऊन, दुष्काळाविरुद्ध जणू युद्धच पुकारलं. मात्र यावेळी त्यांच्याकडे गोळ्या, बंदुका नव्हे तर कुदळ, फावडं, डोजर वगैरे शस्त्रं होती.

 

धरणात मोजकी वाहने असली तरी काही दिवसातच या ठिकाणी आणखी काही वाहने या धरणाच्या परिसरात दिसणार आहेत. या धरणात जवळपास 15 फूट गाळ साठला आहे. हा गाळ काढला तर नेर धरणाची क्षमता वाढेल आणि पाणीटंचाई जाणवणार नाही.

 

विशेष म्हणजे धरणातून काढण्यात येणारा गाळ शेतक-यांना मोफत दिला जाणार आहे.

 

धरणातून निघणाऱ्या या गाळाला शेतकरी काळ सोनं म्हणून ओळखतो. हा गाळ मोफत मिळत असल्यामुळे या भागातले खूश आहेत. त्यांनी सर्व आजी माजी सैनिकांचे आभार मानलेत.

 

ब्रिटीश काळातले हे धरण मान, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील असंख्या गावांची तहान भागवतं. मात्र यातील गाळ काढण्याचं काम आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. पण आता या सैनिकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे धरणातील गाळ तर निघेलच, पण या धरणातील पाणीसाठा तिपटीने वाढेल.