सोलापूर: वय वर्षे अवघे सोळा आणि उंची तब्बल सहा फूट सहा इंच. सोलापुरातल्या दहावीच्या विद्यार्थ्याची ही उंची विक्रमी ठरण्याकडे वाटचाल करत आहे.


 

यशवंत ब्रह्मदेव राऊत असं या पठ्ठ्याचं नाव आहे.  'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'साठी त्याचं नामांकन झालं होतं. निर्मलाताई ठोकळ प्रशालेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याची शाळेच्यावतीन जंगी मिरवणूक काढण्यात आली. किशोरवयीन मुलांच्या वर्गात तो देशातला सर्वात उंच ठरला आहे.



नाव यशवंत ब्रह्मदेव राऊत. दहावीत शिकणारा हा सोळा वर्षाचा कुमारवयीन नव्या विक्रमाची नोंद करतोय.  अहमदाबाद इथं झालेल्या कुमार वयातील सर्वात उंच व्यक्तीच्या स्पर्धेतील किताब त्याने जिंकला आहे. सहा फूट, सहा इंच उंची पंधरा वर्षे वयात खूपच दुर्मिळ असते. सोलापुरातल्या निर्मलाताई ठोकळ प्रशालेचा हा विद्यार्थी आता जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाला आहे.



शाळेत आणि समाजात फिरताना यशवंत सर्वांचं आकर्षण ठरतो. त्याची उंची कोणाचंही लक्ष वेधून घेते. घरातली माणसं, शाळेतले मित्र, शिक्षक आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी तो भाव खाऊन जातो. लहानपणापासून उंची असल्याने घरच्यांना फारसं कौतुक नव्हतं. पण जाणकारांच्या आग्रहाखातर आईवडिलांनीसुद्धा विक्रमी उंचीसाठी स्पर्धेत उतरायचं ठरवलं.



डिसेंबर २०१४ मध्ये   देशातल्या टॉप वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्सच्या स्पर्धेत यशवंतला जिनिअस अवार्ड मिळाला. लिम्का बुकातही त्याची नोंद झाली आहे. आता गिनीज बुकात नाव नोंदवण्यासाठी त्याच नामांकन झालं आहे. निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या या विद्यार्थ्याची  शाळेन जंगी मिरवणूक काढली. त्याची उंची आणि देशात त्याचा होणारा गौरव यामुळे शाळेचा नावलौकिकही वाढला आहे.

 

यशवंत राऊत हा सर्वात लहान वयातील सर्वात उंच विद्यार्थी ठरला आहे. हवाई दलात सेवा करून त्याच्या स्वतःच्या उंचीला आणखी उंचावर नेण्याचा त्याचा मानस आहे.