साताऱ्यात कराड-चिपळूण रस्ता रुंदीकरणाचं काम काही महिन्यांपासून सुरु आहे. या रस्त्याच्या कामासाठी काही जमिनी प्रशासनाने भाडे तत्त्वावर घेतल्या होत्या. त्यात आमरावती चव्हाणं यांचं शेतातील घरही येत होतं. मात्र त्यांनी घराची जमीन देण्यास विरोध केला. तरीही काही दिवसात त्या भागात रस्त्याचं काम सुरु झालं.
याविरोधात आमरावती चव्हाण यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्या तक्रारींना वैतागून आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी 29 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आमरावती यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिलं.
या घटनेत त्या सुमारे 75 टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल (3 एप्रिल) त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पाटण पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.