सातारा : एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना नुकतीच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काळज गावात घडली. चिमुकल्याची आई आपल्याला सहकार्य करत नाही. म्हणून केलेल्या या कृत्याचा पाढा जेरबंद झालेल्या आरोपीने पोलिसांसमोर वाचलाय.
सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल काळज गाव. गाव तसं साध. मात्र, याच गावातून 29 सप्टेंबरला सायंकाळी झोळीतून दहा महिन्याचा ओम भगत हे चिमुकलं बाळ अचाकन बेपत्ता झाल. संपूर्ण घर विस्कळीत झालं. चिमुकल्याच्या आई-वडिलांसह संपुर्ण कुटुंब आणि कुटुंबासह संपूर्ण गाव या चिमुकल्याचा शोध घेऊ लागले. माळकरी असलेल्या चिमुकल्याचे वडील त्रिंबक सैरभैर झाले. मुलाचं अपहरण झाल अशी गावात चर्चा सुरु झाली. गावात काहींनी सांगितले की, गावात बाईक वरुन एक जोडपं आलं होतं. त्यांनीच बाळाच अपहरण केलं. ग्रामस्थांच्या या माहितीने लोणंद पोलीस ठाणे कामाला लागले. गावातील कोपरा न् कोपरा शोधत असताना नाक्या नाक्यावर पोलीस लावून गाड्यांची तपासणी सुरु केली.
मुलाचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर पोलिसांनीच व्हायरल केली. सातारा जिल्ह्यातील एकही असा ग्रुप नसेल की त्यावर या बाळाची माहिती आली नाही. चक्क जिल्हा पोलीस प्रमुखांनीही घटनास्थळाला जाऊन माहिती घेतली. बाळाचा शोध त्या दाम्पत्यावर घुटमळू लागला. शोध सुरु असतानाच त्या चिमुकल्याच्या घरातल्यांचा आक्रोश काळजाला भिडत होता. बाळ सापडेल अशी आशा पोलिसांसह सर्वांनाच वाटत होती आणि कशाच काय बाळाचा मृतदेह त्यांच्याच घराच्या पाठीमागे आसलेल्या विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसला.
गावात एकच कल्लोळ माजला. काही वेळातच लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष चौधरी घटनास्थळी दाखल झाले. त्या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढला. माळकरी असलेल्या त्रिंबकांच्या वाट्याला हे असे घडायला नको होते अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. कारण तीन मुलींच्यानंतर हा ओम जन्माला आला होता. पोलिसांची चक्र वा-यागत फिरू लागली. त्या बाळाचे अपहरण झालेच नसल्याचं प्राथमिक दिसू लागले. भला मोठा कठडा असलेल्या विहिरीत चिमुकल बाळ गेले कसे? हा प्रश्न लोणंद पोलिसांना पडला होता.
संपूर्ण गाव संतप्त झालं होतं. ग्रामस्थांनी पोलिसांनाच धारेवर धरलं. आरोपी शोधून काढा तेव्हाच बाळावर विधी होईल, असा अट्टाहास धरला. ग्रामस्थांची मागणी असली तरी लोणंद पोलिसांच्या हातात अगोदरच धागेदोरे लागले होते. परंतु, विधी होईपर्यंत शांत राहू अशी भुमिका ठेवत पोलिसांनी मौन पाळले. विधी आटोपला आणि पोलिसांनी शेजारच्या तडवळे गावातल्या युवकाच्या मुसक्या रात्रीतच आवळल्या. शेजारच्या गावातील अभिजित लोखंडे या 28 वर्षाच्या युवकाला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या मिळताच त्याने हे अमानूष कृत्य का केले याचा पाढा वाचायला सुरवात केली. आणि ते ऐकून पोलीस सुन्न झाले.
अभिजित लोखंडे हा मुळचा फलटण तालुक्यातील तडवळे गावातील. पदवीधर शिक्षण घेतलेल्या अभिजीतने पोलीस भरती आणि आर्मीच्या भरतीसाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून या चिमुकल्याच्या आईच्या प्रेमात तो चांगलाच गुरफटला होता. चिमुकल्याच्या आईसोबत संबंध वाढवण्यासाठी आरोपी अभिजित लोखंडे हा वारंवार फोन करत होता. बाळाची आई या चिमुकल्या बाळामुळे अभिजितच्या प्रेमाला सहकार्य करत नसल्यामुळे त्याने या चिमुकल्यालाच संपवण्याचा कट रचला. आणि बाळाचे अपहरण केले. बाळाला घेऊन जाता जाता पायवाटेत असलेल्या विहिरीत टाकून दिल्याची कबुली अभिजीतने पोलिसांना दिली.
या प्रकाराबाबत माझाने या कुटुंबातील लोकांशी संपर्क साधल्यावर अनेक पैलू यातून पोलिसांसमोर येणार असल्याचं दिसत आहे. चिमुकल्याच्या वडिलांनी याबाबत त्या मुलाचा वारंवार फोन येत होता, असं स्पष्ट सांगितले. मात्र, या घटनेवर बाळाच्या आईने बोलण्यास मात्र नकारा दिलाय. त्या बाळाचे मामा मंडळी सध्या तेथेच ठाण मांडून आहेत. आरोपीला सध्या न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या पाच दिवसाच्या कालावधीत आता पोलिसांकडून नेमका कोणत्या कोणत्या प्रकाराचा उलघडा होते हे समजेलच. शिवाय यात आणखी कोण आरोपी आहे का हेही काही दिवसातच समजेल.