सारंगखेडा (नंदुरबार) : महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेशातील पर्यटकांना तसेच भाविकांना जोडणाऱ्या नंदुरबारमधील सारंगखेड्यात चेतक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले आहे. धमाकेदार आणि रंगारंग कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
13 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान फेस्टिव्हल असणार आहे. 17 डिसेंबरला खान्देश कन्या आणि पुत्रांचा सन्मान सोहळा असणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आल्यामुळे आता चेतक फेस्टिव्हलचे आयोजन हे अत्यंत धूमधडाक्यात केले जात आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या मातीत विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रात कार्याचा महामेरू उभा करणाऱ्या मान्यवरांना उत्तर महाराष्ट्र रत्न हा सन्मान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 17 डिसेंबरला दिला जाणार आहे.
कोण-कोण उपस्थित राहणार?
सारंगखेडा हे धार्मिक स्थळासोबत आता पर्यटन स्थळ म्हणून देशाच्या व जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झाले आहे. येथे साजरा होत असलेल्या चेतक फेस्टीव्हलचे नियोजन जोश आणि जल्लोषात केले जात आहे. मान्यवरांना सन्मान प्रदान करण्यासाठी खास करुन मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन व सास्कृतिमंत्री डॉ. महेश शर्मा, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महाराष्ट्राचे जलसंपदा गिरीश महाजन, खासदार छत्रपती संभाजीराजे, उदयपूर (मेवाड) चे राजकुमार लक्षराजसिंह, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार डॉ. विजय गावीत आदी उपस्थित राहणार आहेत.
उत्तर महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध घेवून विविध क्षेत्रात अनेक मान्यवरांनी देशात आणि जगभरात भरारी घेत नावलौकिक मिळवला आहे. त्यातील सर्वोत्तम आयडॉल यांना उत्तर महाराष्ट्र रत्न सन्मान देवून गौरवले जाणार आहे. यात पर्यटन, कला, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग आदी क्षेत्रातील मूळच्या खान्देशी कन्या व पुत्रांचा गौरव केला जाईल. खान्देशी माणूसही आपल्या कर्तबगारीच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात मोठा होवू शकतो, आपल्या मेहनताच्या बळावर जगभरात नाव कमावू शकतो असा आदर्श युवा पिढीसमोर उभा करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे चेतक फेस्टिव्हलमध्ये आयोजन केले आहे.
सारंगखेडा येथे महानुभाव संप्रदायाचे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. या संप्रदायाचे महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील भाविक सारंगखेडा येथे लाखोंच्या संख्येत येतात. सारंगखेडा यात्रेला किमान 300 वर्षांचा इतिहास आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये यावर्षी 50 लाख पर्यटक येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.