मुंबई : नवीन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज (31 जानेवारी) आहे. जानेवारी महिन्यात दोन संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे. पहिली संकष्टी चतुर्थी 2 जानेवारीला होती तर दुसरी चतुर्थी आज 31 जानेवारीला आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी पर्वणी असणार आहे. सामान्यपणे संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त मंदिरामध्ये गणपती चं दर्शन घेतात. तर काही जण या दिवशी उपवास ठेवतात.
कोरोना संकटामुळे अनेक महिने बंद असलेली मंदिरं योग्य ती खबरदारी घेत खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असणार आहे. तरी देखील भक्तांनी मंदिरांमध्ये गर्दी करणे टाळायला हवे. कोरोनाचं संकट कमी झालं असंल तरी पूर्णपणे टळलेलं नाही.
दर महिन्यात संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थी अशा दोन चतुर्थी येतात. सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास दुपारच्या (मध्यान्ह) वेळी 12 वाजता सोडला जातो. पण संकष्टीची उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व आहे. चंद्राला अर्घ्य देऊन बाप्पाची आरती करुन उपवास सोडला जातो. यावेळी बाप्पाला मोदकांचा नैवेद्यही दाखवला जातो.
जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ?
31 जानेवारी रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी रात्री 9 वाजून 04 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे यावेळी पूजा करता येईल आणि चंद्रदर्शन घेता येईल.
पूजा- विधी
सकाळी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र ठेवून बाप्पाला दूध-पाण्याचा अभिषेक करुन घ्यावा. नंतर हळद कुंकू, अक्षती, फुलं, दुर्वा, शमीची पाने वाहावी. दिवा, अगरबत्ती बाप्पाला ओवाळून घ्यावी. चौरंग किंवा पाटावर पानाचा विडा ठेवून त्याचीही पूजा करावी. गोडाचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
पूजेनंतर गणपतीच्या मंत्रांचा जप करावा आणि संकष्टीचा उपवास ठेवावा. अथर्वषीर्षाचं पठण करा. संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीचे पूजन आणि आरती करा. त्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊन मग उपवास सोडावा.
2021 मधील संकष्टी चतुर्थी
02 जानेवारी, शनिवार, संकष्टी चतुर्थी
31 जानेवारी, रविवार, संकष्टी चतुर्थी
02 मार्च, मंगळवार, अंगारकी चतुर्थी
31 मार्च, बुधवार, संकष्टी चतुर्थी
30 एप्रिल, शुक्रवार, संकष्टी चतुर्थी
29 मे, शनिवार, संकष्टी चतुर्थी
27 जून, रविवार, संकष्टी चतुर्थी
27 जुलै, मंगळवार, अंगारकी चतुर्थी
25 ऑगस्ट, बुधवार, संकष्टी चतुर्थी
24 सप्टेंबर, शुक्रवार, संकष्टी चतुर्थी
24 ऑक्टोबर, रविवार, संकष्टी चतुर्थी
23 नोव्हेंबर, मंगळवार, अंगारकी चतुर्थी
22 डिसेंबर, बुधवार, संकष्टी चतुर्थी