पुणे : माजी न्यायमूर्ती आणि एल्गार परिषदेचे (Elgar Parishad) आयोजक बी. जी. कोळसे पाटील (B. G. Kolse Patil) यांनी एल्गार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान, लाल किल्ल्यावर ज्यानं झेंडा फडकवला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माणूस होता, असा थेट आरोप कोळसे पाटील यांनी केला आहे.


एल्गार परिषदेत बोलताना कोळसे पाटील यांनी अनेक गोष्टींचा संदर्भ देत मोदी सरकारवर निशाणा साधला. "पंतप्रधान मोदींनी देशासाठी बरंच काही केलं आहे, असं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीही केलेलं नाही." , असा आरोपही बी. जी. कोळसे पाटील यांनी मोदींवर केला आहे. तसेच पठाणकोटमध्ये मुंगीदेखील जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी दहशतवादी घुसले कसे? , असा प्रश्नदेखील कोळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.


पुण्यात काल (शनिवारी) एल्लार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे एल्गार परिषद पार पडली. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण जर परवानगी मिळाली नाही, तर रस्त्यावर या परिषदेचं आयोजन करण्यात येईल, असा इशारा निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली होती.


याआधी झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे आजच्या होणाऱ्या या एल्गार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या आधी 31 डिसेंबरला ही परिषद घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी या परिषदेचं आयोजन केलं. या परिषदेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिषदेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं. साध्या वेशातील पोलिसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.


यापूर्वीची एल्गार परिषद ठरली होती वादग्रस्त


यापूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद वादग्रस्त ठरली होती. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच, 1 जानेवारी 2018 या दिवशी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी एल्गार परिषदेचा संबंध कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराशी जोडला होता. याप्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. तसेच देशभरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत याप्रकरणी अद्यापही तुरुंगात आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी या परिषदेला परवानगी नाकारल्याचं बोललं जात होतं. परंतु, त्यानंगर 30 जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, काल ही परिषद पार पडली.