वर्धा : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात लग्न करायचे नसल्याने मुलीने मैत्रीणीला सोबत घेऊन घर सोडले. पोलिसांच्या सतर्कतेने दोघीही कारंजाला सुखरूप परतल्या आहेत.  मुलीच्या घरी लग्नाच्या चर्चा सुरू असताना मुलीला मात्र लग्न करायचं नव्हतं. त्यामुळं मुलगी आपल्या मैत्रीणीला सोबत घेऊन घरातून निघून गेली. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवली आणि दोन्ही मुलींना गोव्याच्या पणजीहून ताब्यात घेतं सुखरूप परत आणलं.


कारंजा (घाडगे) तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली मैत्रीणी आहेत. एकीच्या घरी लग्नाबाबत चर्चा सुरू होत्या. पण, मुलीला लग्न करायचं नसल्यानं तिनं आपल्या मैत्रिणीला सोबत घेतलं आणि घर सोडलं. मुली बेपत्ता असल्यानं पालकांचा जीव टांगणीला लागला. पालकांनी याबाबत कारंजा पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबविली.


या मुली कारंजा येथून नागपूर, नागपूरमधून पुण्याला आणि तेथून त्या गोव्याला गेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कारंजा पोलिसांनी तातडीने गोव्यातील पणजी पोलिसांशी संपर्क साधला. पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिसांनीही तातडीने पावलं उचलत ज्या ठिकाणी मुली उतरल्या त्या ठिकाणी पोहोचले. मात्र मुली उतरलेल्या स्थळावर दिसून आल्या नाहीत.


तिथे पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता त्या टॅक्सीत गेल्याचे कळले. पुढे शोध घेताना मिळालेल्या माहितीवरून पणजी पोलिसांनी त्या दोघींना एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. दरम्यान, कारंजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी पोलिसांचे एक पथक गोव्याच्या दिशेने रवाना केले. सदर पथक 29 जानेवारी रोजी दोन्ही अल्पवयीन मुलींना कारंजा येथे सुखरूप घेऊन परतले. कारंजा पोलिसांनी वेळेत दखल घेत तपासाला वेग देत मुलींना सुखरुप परत आणले. त्यांनी सोबत नेलेले दागिणे पोलिसांनी आईवडिलांच्या स्वाधीन केले.


पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मोहनधुळे, उपनिरीक्षक सचिन मानकर , यशवंत गोहत्रे, पूजा लोहकरे,  निखिल फुटाणे, उमेश खामनकार, विनोद येमबाडे यांनी तपासात सहकार्य केले.