Sanjay Raut Wrote letter to Vice President : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी हा दावा केला आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले. 


सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...


संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले. 






कुटुंबियांवर दबाब


संजय राऊत यांनी पत्रात म्हटले की, अलिबागमध्ये त्यांची एक एकर जमीन आहे. ही जमिन 17 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली, त्यांच्या कुटुंबीयांना ईडीकडून त्रास दिला जात आहे. जमीन व्यवहारासाठी कागदपत्रांसाठी नमूद असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम मिळाली अशी कबुली द्यावी यासाठी ईडीकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. 


2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. 


28 जण बेकायदेशीरपणे ताब्यात


तपास यंत्रणांनी आतापर्यंत 28 जणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या लोकांनी तपास यंत्रणांना अनुकूल असा जबाब द्यावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे अशी धमकी त्यांना देण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले. 


डेकोरेटर्ससह अन्य व्यावसायिकांनाही धमकी


तपास यंत्रणांकडून मागील वर्षी त्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी असलेले डेकोरेटर्स आणि इतर विक्रेत्यांना 50 लाख रोख मिळाल्याचा जबाब घेण्यासाठी फोन करून धमकावत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे.