सांगली : स्वीडनची तरुणी सांगलीची सून बनली आहे. संदीप जयेंद्र पाटील असं नवरदेवाचं नाव असून तो मूळचा सांगलीचा आहे तर मरियम दी फाईन लिंच असं नवरीचं नाव असून ती मूळची स्वीडनची आहे. भारतीय पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाह सोहळा गोवा इथे नुकताच संपन्न झाला.
या दोघांच्या प्रेमाची सुरुवात स्वीडनमध्येच झाली. संदीप पाटीलने बारावीपर्यंतचं शिक्षण सांगलीतून पूर्ण केल्यानंतर तो वैद्यकीय शिक्षणासाठी 2003 मध्ये रशियाला गेला. या ठिकाणी स्वीडनमधील तरुणी मरियमही शिक्षण घेत होती. इथेच संदीप आणि मरियमची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांच्या मनात लग्नाचा विचार बळावू लागला.
संदीप आणि मरियमने आपापल्या कुटुंबाला लग्नाची बातमी दिली. मरियमच्या कुटुंबाकडून लग्नाला तात्काळ होकार मिळाला. पण परराष्ट्रातील मुलगी सून म्हणून स्वीकारण्याची मनस्थिती संदीपच्या कुटुंबात नव्हती. भाषा, संस्कृती आणि धर्माची अडचण येणार होती. पण आपल्या मुलाच्या सुखासाठी पाटील कुटुंबानेही या लग्नाला होकार दिला.तसंच मरियमने संदीपसोबत भारतात येऊन त्याचे आई-वडील, नातेवाईकांची मनं जिंकली.
संदीपच्या कुटुंबाने लग्नाचा बेत आखला तो गोव्यात. अगदी हळद लावणे, नवरदेवचे कान पिळण आणि नवरा-नवरी एकमेकांना हार घालताना होणारी कसरत या लग्नातही झाली आणि 24 फेब्रुवारी रोजी गोव्यात संदीप आणि मरियम हे भारतीय पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. या लग्न सोहळ्याला भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, जर्मनी इथल्या पाहुण्यांनी आणि मरियमच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
भारतीय रितीरिवाजाप्रमाणे हा लग्नसोहळा पार पडला. पराराष्ट्रातील पाहुण्यांनी यात भाग घेऊन या लग्नसोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी संदीपने आपली प्रेम कहाणी सगळ्यांना सांगितली तर मरियमने भारतीय संस्कृतीचं कौतुक केलं आहे.
फॉरेनची पाटलीण, स्वीडनची तरुणी बनली सांगलीची सून
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2019 01:45 PM (IST)
मरियमच्या कुटुंबाकडून लग्नाला तात्काळ होकार मिळाला. पण परराष्ट्रातील मुलगी सून म्हणून स्वीकारण्याची मनस्थिती संदीपच्या कुटुंबात नव्हती. भाषा, संस्कृती आणि धर्माची अडचण येणार होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -