सांगली : आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात हाणामारी झाली आहे. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांचा पाय मोडला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यवसन मारहाणीपर्यत गेले. या घटनेनंतर आटपाडी मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आटपाडी मध्ये पोलीसाची कुमक वाढवली गेलीय.


आमदार पडळकरांची गाडी आपल्या अंगावर घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केलाय. यात आणखी काहीजण जखमी आहेत. आटपाडी पोलीस स्टेशन जवळील साठे चौकात ही घटना घडलीय. 


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक लागली आहे. भाजपकडून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी अर्ज भरले आहेत. या दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मानेवाडी सोसायटी मार्फत सर्वानुमते दादासाहेब बरकडे यांना मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव झाला आहे. भाजप गटाकडे कल असलेल्या बरकडे यांनी शिवसेनेच्या तानाजी पाटील यांना समर्थन दिले आहे.


या मुद्यावरून भाजपच्या समर्थकांची बरकडे यांच्या नातलगांशी बाचाबाची झाली. पुन्हा या विषयावरून दुपारी पडळकर व राष्ट्रवादीचे राजू जानकर यांच्यात फोनवरून वादावादी झाली. दरम्यान, मतदार पळवापळवीच्या शक्यतेने सेना व राष्ट्रवादीचे समर्थक साठेनगर चौकात जमले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील देखील यावेळी उपस्थित होते. निंबवडे रस्त्यावरून आमदार पडळकर हे चालक गणेश भुते यांच्यासोबत एका गाडीत आणि ब्रम्हानंद पडळकर दुसऱ्या गाडीत होते. साठे चौकात या गाड्यांवर सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यावेळी ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीने बाळू मोटे यांना उडवले. तर आमदार पडळकर यांची गाडी दिघंचीच्या दिशेने गेली आणि माघारी परततांना त्यांच्या गाडीने मोटारसायकलला ठोकर देत राजू जानकर यांना ठोकरले. या घटनेत सुदैवाने सपोनि पाटील थोडक्यात बचावले. परंतु राजू जानकर यांचा पाय मोडला तर बाळू मोटे गंभीर जखमी झाले आहेत.


या घटनेमुळे आटपाडी शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांच्या उपस्थितीत साठे चौकात काठ्या घेऊन सुमारे 200 कार्यकर्ते आणि साई मंदिर चौकात पडळकर समर्थक सुमारे 200 कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवल्याने थोडा तणाव कमी झाला. परंतु या घटनेचे पुन्हा पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.


महत्वाच्या बातम्या :