पंढरपूर : केंद्र सरकारकडून वारकरी संप्रदायासाठी उभारण्यात येत असलेल्या १० हजार कोटीच्या पालखी मार्ग शुभारंभ सोहळा उद्या पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे. या मार्गाचे श्रेय मिळविण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हायजॅक केला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे काम केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी याचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत होणार होता .
मात्र यापूर्वी गडकरी यांच्या मंत्रालयाकडून महाराष्ट्रात झालेले कार्यक्रम शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांसह इतर राज्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीमुळे हे कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक केल्याचा आक्षेप घेत भाजप नेत्यांनी रद्द करायला लावला आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्याचा घाट घातला असे म्हटले जात आहे.
त्यानुसार उद्या पंतप्रधानांच्या हस्ते हा कार्यक्रम होत असल्याने राष्ट्रवादी , शिवसेना किंवा काँग्रेसच्या मंत्र्यांना यात श्रेय मिळणार नसल्याने अद्याप राज्यातील कोणत्याच नेत्याचे उपस्थितीबाबत निश्चित ठरवण्यात आलेले नाहीत. भाजपाला वारकरी संप्रदायाला खुश करणारा हा कार्यक्रम पूर्णतः भाजप नियंत्रित ठेवायचा असून यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. व्ही. के. सिंग, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गोरे आदी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण असताना केवळ ३ हेलिपॅड ची व्यवस्था केल्याने केवळ गडकरी , फडणवीस आणि व्ही के सिंग एवढेच मान्यवर सोहळ्याला हजेरी लावणार हे नक्की झाले आहे . या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील व्हिडीओ द्वारे संबोधित करणार असून पुणे , सातारा , सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार , खासदार याना निमंत्रण दिले आहे. आता व्यासपीठावर बहुतांश भाजप नेते उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रमाचे श्रेय घेण्याचा भाजपच उद्देश सफल होताना दिसत असल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे.