हिंगोली : गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ झाले, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पेटलेला असतानाच आता एका एसटी चालकाने चक्क मद्यप्राशन करून बस चालविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना हिंगोलीच्या कळमनुरी आगारात घडली आहे. याप्रकरणी बस चालकाविरुद्ध हिंगोली आगारांमध्ये तक्रार करण्यात आली आहे.
एसटी चालकाने मद्यप्राशन करून बस चालविल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या चालकाच्या जेवणाच्या डब्यात देखील दारुच्या बॉटल आढळून आल्या आहेत. या बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याकाळात एसटी चालक कामावर रुजू होत नसल्यामुळे खासगी वाहन चालकांच्या ताब्यात एसटीचे स्टेरिंग देऊ नये, अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. मात्र, अशी मागणी करणारे एसटी कर्मचारीच मद्य प्राशन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये खासगी प्रवाशांच्या बसमधील ड्रायव्हरला चक्कर आल्यामुळे प्रसंगावधान दाखवत एका महिलेने स्टेरिंगचा ताबा मिळवत चालकाला रुग्णालयात दाखल केले होते. तसेच इतर प्रवाशांनासुद्धा त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले होते. दुसरीकडे मात्र, एसटी महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपामुळे आधीच प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांचे हाल हे तर खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडले आहेत. एसटी बस बंद असल्याने नाईलाजाने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहेत. त्यातून प्रवाशांची लूट होत आहे. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवाशी येत असल्याचे हिंगोलीत दिसून आले. याप्रकरणी आता बस चालकाविरुद्ध हिंगोली आगारांमध्ये तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता बस चालकाविरुद्ध कारवाई होणार का हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या: