इंडोनेशिया : विवाहबाह्य संबंध ठेवल्याबद्दल इंडोनेशियामध्ये एका महिलेला 100 चाबकाचे फटके मारण्यात आले आहेत. तर तिच्या पुरुष साथीदाराला केवळ 15 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली आहे. इंडोनेशियातील आचे प्रांतात गुरुवारी ही घटना घडली. विशेष म्हणजे, ही शिक्षा इस्लामिक शरिया कायदा प्रणालीनुसार महिलेला देण्यात आली होती. या कायद्यानुसार, चाबूक मारणे ही शिक्षेची एक सामान्य प्रथा आहे.


सार्वजनिक ठिकाणी 100 चाबकाचे फटके
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके देण्यात आले. या शिक्षेदरम्यान शेकडो लोक तेथे उपस्थित होते आणि या घटनेचा व्हिडिओ बनवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, फटके मारण्याची ही प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली होती, कारण शिक्षा झालेल्या महिलेला चाबकाचे दुखणे सहन होत नव्हते.


विवाहाबाहेर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी शिक्षा
पूर्व आचे प्रांताच्या फिर्यादी कार्यालयातील तपास विभागाचे प्रमुख इव्हान नज्जर अल्लावी यांनी एएफपीला सांगितले की, विवाहित महिलेने तिच्या विवाहबाह्य पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने विवाहित महिलेला ही कठोर शिक्षा सुनावली. 


पुराव्याअभावी 'त्या' व्यक्तीला कोणतीही शिक्षा देण्यात आली नाही
दरम्यान, महिलेने ज्या व्यक्तीसोबत हे संबंध असल्याची कबुली दिली होती, त्या व्यक्तीने न्यायालयात असे कोणतेही नाते स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायाधीश त्याला दोषी ठरवू शकले नाहीत. रिपोर्ट्सनुसार, ती व्यक्ती देखील विवाहित होती. त्या व्यक्तीबाबत सांगताना अल्लावी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, खटल्यादरम्यान त्याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप नाकारले आणि काहीही कबूल केले नाही, त्यामुळे तो दोषी आहे की नाही हे न्यायाधीश सिद्ध करू शकले नाहीत. मात्र, त्या विवाहित पुरुषाला 2018 मध्ये पाम तेलाच्या मळ्यात स्थानिकांनी एकत्र पाहिले होते. त्यामुळे त्या व्यक्तीला आपली पत्नी नसलेल्या स्त्रीबद्दल आकर्षण दाखवल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याला 15 फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha