सांगली : मिरजेत अपेक्स हॉस्पिटल प्रकरणात डॉ. महेश जाधव यांच्या भाऊ डॉ. मदन जाधव याला अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यातील आरोपीची संख्या 10 झाली आहे.  87 रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी अपेक्स कोविड हॉस्पिटलच्या डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात  गांधी चौकी पोलिसांनी डॉ महेश जाधवसह स्टाफमधील  8 जणांना आधी अटक केली होती. या गुन्ह्याच्या पोलिस तपास करत असताना या गुन्ह्यात डॉ. महेश जाधव यांचा भाऊ डॉ. मदन जाधव आणि  त्याच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा ब्रदर बसवराज कांबळे या दोघांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे.  आज डॉ मदन जाधव आणि बसवराज कांबळे या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. मदन जाधव हे डॉक्टर आहेत. सांगली येथे त्यांचे हॉस्पिटल आहे. आज त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीची संख्या आता 10 झाली आहे.


 दरम्यान apex हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलला परवानगी दिल्याबाबत महापालिकेचे वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी  एका निवेदनातुन खुलासा दिला आहे. APex कोविड रुग्णालयाचा परवाना नियमानुसारच देण्यात आला असून 22 डॉक्टरांसह 55 कर्मचाऱ्यांचा स्टाफ असल्याची माहिती रुग्णालयाने दिली होती. तसेच जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त परीक्षण समितीनेही या रुग्णालयाची वेळोवेळी तपासणी केली होती असे आरोग्य अधिकारी यांनी खुलासा करताना म्हटले आहे. महापालिकेने एकाच अर्जावर परवानगी दिलेली नसून बॉम्बे नर्सिंग अॅक्टअंतर्गत सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारेच या रुग्णालयाला डेडीकेटेड कोविड रुग्णालयाची मान्यता दिल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने महापालिकेचे वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे यांनी केलाय.


डॉ.महेश जाधवचे  औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, जयसिंगपूर , सांगली या 5 ठिकाणी  एम.जे. कॉस्मेटीक सेंटर आहेत. या पाचही सेंटरवर एकही प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे देखील पोलिसांना माहिती मिळाली आहे. यामुळे सांगली पोलीस दलाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल  आणि नॅशनल मेडिकल कमिशनकडे डॉ.महेश जाधवचा एम जे कॉस्मेटीक सेंटरचा परवाना रद्द व्हावा यासाठी पत्र व्यवहार केला आहे. तसेच सांगलीमधील महेशची सर्व संपत्ती आणि बँक खात्यामधील रक्कम आणि व्यवहाराची डिटेल्स मिळावीत अशी पोलिसानी रजिस्ट्रारकडे मागणी केली आहे.


काय आहे प्रकरण?


रुग्णांची हेळसांड करून तब्बल 87  रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या मिरज मधील येथील अ‍ॅपेक्स केअर हॉस्पिटलवर आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही कोविड रुग्णालय सुरू करून या हॉस्पिटलमध्ये तज्ञ वैद्यकीय पथकाऐवजी होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून रुग्णावर उपचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आलाय. याशिवाय भरमसाट बिलांची आकारणी करून पावत्या देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.  या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकांना संपूर्ण बीलाच्या 10 टक्के रक्कम ही कमिशन म्हणून दिली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आलीय. तर   मेडीकल शॉप चालविणाऱ्या इसमाकडुन विकल्या गेलेल्या औषधाचे नफ्यातील 50 टक्के रक्कम ही डॉ. महेश जाधव घेत असे. तसेच  रूग्णांची तपासणी करणाऱ्या लॅब मालकाकडून  तपासणी बीलाच्या ३० टक्के रक्कम डॉ.जाधव घेत असे. तसेच अ‍ॅपेक्स कोरोना रुग्णलयात अन्न व औषध प्रशासनच्या पथकाने  छापा टाकून 4 लाख 30 हजाराचा औषध साठा जप्त केलाय.  डॉ. महेश जाधव याच्या एम जे कॉस्मेटीक सेंटरवर  रात्री महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून महत्वाची कादपत्रे देखील जप्त केलीत. धक्कादायक बाब म्हणजे, डॉ.महेश जाधव वर सांगली शहर पोलीस ठाण्यात 25 सप्टेंबरला भा.द. वि.स.कलम 336, 337, 338, 34 सह महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 चे कलम 33 अन्वये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट करताना कोणतीही प्रशिक्षित नसलेल्या इसमाकडून ट्रीटमेंट केल्याप्रकरणी आणि सदर व्यक्तीला जखमी केल्याप्रकरणी होता. याहून गंभीर बाब म्हणजे, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील डॉ.महेश जाधवने रुग्णावर सर्जिकल उपचार करणे सुरूच ठेवले होते.