सांगली : महानगरपालिकेच्या मुख्यालयात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेच्या पतीकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीच्या नाट्याने महापालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली होती. मिरज येथील एकाच प्रभागातील हे दोन्ही नगरसेवक असल्याने विकासकामाच्या श्रेयवादावरून हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे.


नगरसेवक योगेंद्र थोरात असे मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव आहे. नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांनी थोरात यांना महापालिका मुख्यालयात मारहाण केली आहे. योगेंद्र थोरात आणि संगीता हारगे हे दोघेही मिरजेतील एकाच प्रभागामधील नगरसेवक आहेत.

या मारहाणप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरोधात धाव घेतली होती. परंतु महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत आहे.

योगेंद थोरात आणि संगीता हारगे मिरजेतील प्रभागामधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. हारगे या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील कामे त्यांना विचारुनच केली जावीत, असा हारगे दांपत्याचा दबाव असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.

थोरात यांनी प्रभागातील काही कामे प्रस्तावित केली आहेत. या मुद्यावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. या कामांवरुन महापालिकेतील अधिकाऱ्यांशी दोन्ही नगरसेवक सतत वाद घालत होते. मंगळवारी थोरात हे महापालिकेत कामानिमित्त आले होते. यावेळी संगीता हारगे त्यांच्या पतीसोबत महापालिकेत आल्या. त्यांनी थोरात यांना प्रभागातील कामावरून जाब विचारला. यातून दोघांमध्ये तू तू मै मै झाली.

हारगे आणि थोरातांधला वाद वाढत गेला. दरम्यान संतप्त झालेल्या अभिजीत हारगे यांनी आपणास मारहाण करत शिवीगाळ केली असल्याचे थोरात यांनी सांगितले. या प्रकारामुळे महापालिकेत तणाव निर्माण झाला. हा प्रकार समजताच दोन्ही गटाचे कार्यकर्ते महापालिकेसमोर जमा झाले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.